सुरज कसबे, प्रतिनिधी
Pune News : पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यात बॉटनी विषयात पीएचडी करणाऱ्या एका विद्यार्थिनीने (३० वर्षे) आत्महत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाचा प्राध्यापक असणाऱ्या सहाय्यक संचालक डॉ. ए. बिन्नियमिन (५० वर्षे) याला अटक करण्यात आली आहे.
प्राध्यापकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केला होता. त्याचा विद्यार्थिनीला मोठा धक्का बसला होता. यातच विद्यार्थिनीने धक्कादायक पाऊल उचलच स्वत:चा जीव घेतला. आत्महत्या करणाऱ्या तीस वर्षीय विद्यार्थिनींच्या वडिलांनी याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे.
नेमकं काय घडलं?
पुण्यातील कोरेगाव पार्कमधून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या महाविद्यालयातील विद्यार्थिनीने शनिवारी ११ एप्रिल रोजी राहत्या घरी शाहूनगर येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. संबंधित तरुणी बॉटनी या विषयात बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया येथे पीएचडी करीत होती. तर आरोपी बिन्नियमिन तिचा गाईड होता. आत्महत्या करण्यापूर्वी संबंधित विद्यार्थिनीने चिठ्ठी लिहून ठेवली आहे. विद्यार्थिनीने चिठ्ठीमध्ये तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला आहे. ऑगस्ट २०२५ पासून बिन्नियमिन हा अनैतिक प्रकार, गैरवर्तन आणि मानसिक त्रास देत होता.
त्याच्या या त्रासाला कंटाळून तरुणीने आत्महत्या केली. दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी दोन दिवस आधी बिन्नियमिन याने स्टॅम्प पेपरवर पुन्हा असा प्रकार करणार नाही. चूक झाली असं लिहून दिलं होतं. परंतु, संबंधित तरुणी या मानसिक धक्क्यातून सावरली नव्हती. त्यामुळे तिने आत्महत्या करीत असल्याचं चिठ्ठीत लिहून ठेवलं आहे. बिन्नियमिन याला अटक केली असून त्याला बुधवार १५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. पोलीस निरीक्षक भोजराज मिसाळ तपास करीत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world