देवा राखुंडे
आषाढी वारीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेत. यात लहान- थोरांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचाच समावेश आहे. सर्वांना विठ्ठल- रुक्मिणीच्या दर्शनाची ओढ लागली आहे. पंढरपुरच्या दिशेने पालख्या निघाल्या आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी असेल किंवा संत तुकाराम महाराजांची पालखी असेल यांचा पालखी मार्ग हा पुणे जिल्ह्यातील दौंड इथून जातो. त्या दौंड इथंच एक धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना समोर आल्यानंतर सर्वच जण हादरून गेले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली हे एक गाव आहे. या गावाच्या थोडं पुढे एक चहाची टपरी आहे. पुणे सोलापूर महामार्ग इथूनच जातो. त्याच ठिकाणी ही चहाची टपरी आहे. त्यामुळे सोलापूरच्या दिशेने जाताना अनेक जण याच ठिकाणी थांबतात, चहा घेतात आणि पुढे जातात. असचं एक कुटुंब पुण्याहून सोलापूरच्या दिशेने चाललं होतं. पहाटेचे सव्वाचार वाजले असतील. तेही याच चहा टपरीवर चहा घेण्यासाठी उतरले. बाहेर बऱ्या पैकी अंधार होता. त्याच वेळी दोन युवक एका वाहानातून त्या ठिकाणी आले.
कुणाला काही समजण्या आता त्यांनी त्यांच्याकडचे कोयते बाहेर काढले. कोयत्याचा धाक दाखवून त्यांनी त्या कुटुंबातील सदस्यांकडे असलेले दागिने हिसकावून घेतले. कोयता त्यांनी त्या कुटुंबीयांच्या गळ्यावरच ठेवला होता. त्यामुळे दागिने दिल्या शिवाय पर्याय नव्हता. त्यानंतर त्या नराधमांची नजर त्यांच्या बरोबर असलेल्या 17 वर्षाच्या मुलीवर पडली. त्यांनी त्या मुलीला चहा टपरीच्या मागे नेत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी तिथून पळ काढला. या घटनेनं हे संपूर्ण कुटुंब हादरून गेलं आहे.
ही घटना पहाटेच्या सुमारास दौंड पोलिसांच्या हद्दीत घडली. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. संबंधीत कुटुंबानी याची तक्रार ही दाखल केली. पुणे सोलापूर हा रस्ता तसा चांगला रहदारीचा असतो. अशा स्थितीत ही घटना घडली आहे. शिवाय वारी असल्याने अनेक जण पंढरपूरला याच मार्गाने जातात. त्यामुळे गाड्यांचीही गर्दी असते. आता त्या आरोपींचा शोध घेतला जात असल्याचं अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी सांगितलं. त्यासाठी टीम ही तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितलं. शिवाय सीसीटीव्ही फुटेजही चेक केले जात आहे. लवकरच त्यांना अटक केली जाईल असा पोलिसांनी सांगितलं आहे.