Pune News: 'तुम्ही आत्महत्या करा..' नसरापूरच्या पीडित मुलीच्या वडिलांना सोशल मीडियावरून दिला जातोय त्रास VIDEO

Pune News: आम्ही आमचं बाळ गमावलंय, आमच्या मनाचा विचार कोण करणार? नसरापूर प्रकरणातील पीडित मुलीच्या वडिलांनी सोशल मीडियावरील युजर्सच्या असंवेदनशीलतेवर बोट ठेवत मांडली काळजाला भिडणारी व्यथा.

जाहिरात
Read Time: 3 mins
Pune News: "नसरापूरमधील बालिका अत्याचार-हत्या प्रकरण, मुलीच्या वडिलांना सोशल मीडियावर दिला जातोय त्रास"
NDTV Marathi

Pune News: नसरापूर येथे काही दिवसांपूर्वी एका निष्पाप चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून पीडित कुटुंब प्रचंड मोठ्या दुःखात आहे. या जबर धक्क्यातून कुटुंब अद्याप सावरलेले नसतानाच, आता सोशल मीडिया युजर्सच्या असंवेदनशीलतेमुळे पीडितेच्या वडिलांचे मोठे मानसिक खच्चीकरण होत असल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियावरून मिळणाऱ्या नको त्या सल्ल्यांना आणि टोमण्यांना कंटाळून वडिलांनी एक व्हिडीओ शेअर केला असून, त्यात त्यांनी आपली अत्यंत तीव्र आणि भावनिक व्यथा मांडली आहे.

"आम्ही लेकरू गमावलंय, आमच्या मनाचा विचार कोण करणार?"

पीडितेच्या वडिलांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, "अशा प्रकारच्या भीषण घटनेनंतर पीडित कुटुंबाचे आयुष्य कसे बदलते, हे फार कमी लोकांना समजते. आज आमच्या घरात आमचे बाळ नाही; पण घराच्या प्रत्येक कोपऱ्यात तिच्या आठवणी जिवंत आहेत. तिचे फोटो, तिच्या वस्तू, तिच्या छोट्या बाहुल्या  आहेत, पण आज ती आमच्यात नाही."

Advertisement

पुढे बोलताना ते म्हणाले, "लोक आम्हाला विचारतात की आता पुढे काय? पुढील कायदेशीर प्रक्रिया काय? पण खरं सांगायचं तर, हाच प्रश्न आम्ही रोज स्वतःला विचारत असतो की आता पुढे काय करायचं? कधी न्यायाची चिंता असते, तर कधी भविष्याची काळजी वाटते. अशातच मुलीची आठवण आल्यावर संपूर्ण दिवस काढणे कठीण होऊन बसते."

(नक्की वाचा : Ambenali Ghat: आंबेनळी घाटात पुन्हा नको ते घडलं, या वेळी जे झालं त्याने परिसरात भीती अन् अंगाचा थरकाप)

"घटना फक्त एका दिवसाची बातमी नसते"

समाजातील वाढत्या असंवेदनशीलतेवर बोट ठेवत त्यांनी स्पष्ट केले की,"अशी एखादी घटना फक्त एका दिवसाची बातमी नसते. तर ती त्या कुटुंबासाठी आयुष्यभराची जखम असते. मी काय हे सहानुभूती मिळवण्यासाठी सांगत नाहीय. तर समाजाने हे समजावं की अशा घटनेनंतर कुटुंबाचा संघर्ष संपत नाही तो तेव्हाच चालू होतो. आज आम्ही न्याय मिळावा म्हणून लढतोय आणि इतर कोणाच्या घरात अशा घटना घडू नये, यासाठी लढतोय".

"टीका करणाऱ्यांनो, किमान शब्दांची तरी जबाबदारी घ्या!"

घटनेनंतर हजारो लोकांनी दिलेल्या आधाराबद्दल कृतज्ञता व्यक्त करतानाच ते पुढे म्हणाले, "घटनेनंतर हजारो लोकांनी आम्हाला धीर दिला, प्रार्थना केल्या, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. पण दुसरीकडे काही लोक मला 'तुम्ही आत्महत्या करा', 'तुमच्यासारखा बाप कोणाला मिळू नये', 'आम्ही असतो तर त्याला गोळ्या घातल्या असत्या, मारलं असतं' अशा प्रकारचे मेसेजेस पाठवत आहेत. ज्या बापाने स्वतःचे लेकरू गमावले आहे, त्याच्या मनात काय चालले असेल याचा विचार हे लोक करत नसतील का?"

Advertisement

वडिलांनी कोणावरही राग व्यक्त न करता एक कळकळीची विनंती केली आहे की, "अशा कठीण प्रसंगात लोकांनी किमान आपल्या शब्दांची तरी जबाबदारी घेतली पाहिजे. कारण एखादा मेसेज लिहिण्यासाठी काही सेकंद लागतात पण वाचणाऱ्याच्या मनावर किती काळ परिणाम राहू शकतो, याचा विचार तुम्ही कधी केलाय? मी काही परिपूर्ण बाप नाहीय, कोणताही माणूस परिपूर्ण नसतो पण माझ्या मुलीवर प्रेम केले नाही, तिच्यासाठी लढलो नाही असे मात्र कोणी म्हणू शकणार नाही. "

(नक्की वाचा : Pune News : घायवळ गँगचा म्होरक्या पुणे पोलिसांच्या जाळ्यात; कोथरूडमधील दहशत संपवण्यासाठी मोठी कारवाई)

"कायदेशीर लढाई सुरूच राहणार"

हा मानसिक त्रास होत असला, तरी मुलीला न्याय मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार नसल्याचा निर्धार त्यांनी पुन्हा व्यक्त केला आहे. "आजही आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत, पुढेही कायदेशीर मार्गाने लढाई लढत राहणार आहोत. पण किमान असे मेसेज करून समोरच्या कुटुंबाला दुखवू नका",असे आवाहन त्यांनी शेवटी केले आहे.

Advertisement

Nasrapur बालिका अत्याचार, हत्या प्रकरण; चिमुरडीच्या वडिलांना Social Media वरुन दिला जातोय त्रास