Pune Crime : पुण्यातील चंदननगर येथील आंबेडकर वसाहतीत किरकोळ वादातून एका तरुणाचा निर्दयी खून करण्यात आला आहे. चुलतीला ‘आय लव यू' म्हटल्याचा राग मनात धरून दोन तरुणांनी हॉकी स्टिक आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करत 35 वर्षीय साईनाथ उर्फ खलीबली दत्तात्रय जानराव याचा खून करण्यात आला. ही घटना मंगळवार 12 ऑगस्ट रोजी रात्री 8.30 च्या सुमारास घडली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सोन्या उर्फ आदित्य संतोष वाल्हेकर (21) आणि समर्थ उर्फ पप्पू करण शर्मा (22) अशी आहेत. पोलीस हवलदार राहुल गिरमे यांच्या फिर्यादीवरून चंदननगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला पोलिसांना बेवारस मृतदेह असल्याची माहिती मिळाली. तपासात मृत व्यक्ती साईनाथ जानराव असल्याचे निष्पन्न झाले. पोस्टमार्टम अहवालात मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
नक्की वाचा - प्रेमात आंधळी झाली अन् घरातील तिजोरीवरच मारला डल्ला; लेकीचा प्रताप पाहून पोलिसही हैराण!
पुढील चौकशीत समोर आले की, मृत साईनाथ याने आरोपी वाल्हेकर यांच्या चुलतीची छेड काढून तिला ‘आय लव यू' म्हटले होते. याचा राग आल्याने आरोपींनी साईनाथला हॉकी स्टिक आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. गंभीर जखमी अवस्थेत त्याला तसेच सोडून दिल्याने त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, आरोपी वाल्हेकर यांनीच पोलिसांना फोन करून ‘एक व्यक्ती पडला आहे' अशी माहिती दिली होती. मात्र तपासात त्यानेच मित्रासह खून केल्याचे उघड झाले. दोघांनाही अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.