पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यात तीन वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली नऊ वर्षीय मुलाला ताब्यात घेण्यात आलं आहे. या घटनेनं पुन्हा एकदा पुण्याला धक्का बसला आहे. अवघ्या तिसरीतील मुलगा असं कृत्य कसा करू शकतो, असा सवाल ही उपस्थित केला जात आहे. मात्र सोशल मीडियाच्या प्रभावाखाली मुलाने अशा प्रकारचं कृत्य केल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नक्की वाचा - सांगली, पुण्यात दोन वेगवेगळ्या भीषण अपघात 5 जणांचा मृत्यू
तीन वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून कोंढवा पोलिसांनी काल 17 डिसेंबरला एका नऊ वर्षांच्या मुलाला ताब्यात घेतलं. पोलिसांनी मुलाला ज्युवेनाईल जस्टिस बोर्डासमोर (जेजेबी) हजर केलं आहे. त्याचा जामीन मंजूर केला आणि त्याचा ताबा पालकांच्या ताब्यात देण्याचे निर्देश दिले आहेत. मुलगी प्री-स्कूलची विद्यार्थिनी आहे. तर मुलगा स्थानिक शाळेत इयत्ता तिसरीचा विद्यार्थी आहे. गेल्या काही काळापासून ते एकाच वस्तीत राहत असल्याने हे कुटुंब एकमेकांना ओळखत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुलगी त्या मुलाला दादा (मोठा भाऊ) म्हणायची. त्याच्या राहत्या घराजवळील एका ठिकाणी ती एकटी दिसली तेव्हा त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तिने तिच्या आईला ही घटना सांगितली. पीडितेच्या आईने या प्रकरणाची पोलिसांकडे तक्रार केली आणि अल्पवयीन मुलाविरुद्ध लैंगिक छळ आणि हल्ल्याशी संबंधित एफआयआर दाखल करण्यात आला. मुलीला बाल हक्कांसाठी काम करणाऱ्या एनजीओच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत विश्वासात घेण्यात आले. तिने घटनेची सविस्तर माहिती दिली. मुलाला ताब्यात घेण्यात आलं असून सोशल मीडियाचा प्रभावामुळे हे कृत्य केल्याचं त्याने सांगितलं.