Pune News: पुण्यात दहशतवादी कृत्याचा प्रयत्न? हडपसरमध्ये सापडला जिवंत बॉम्ब, पोलिसांकडून परिसराची नाकेबंदी

Pune News: पुण्यातील गजबजलेल्या हडपसर परिसरात बुधवारी एकच खळबळ उडाली. येथील कामधेनू इस्टेटमधील एका प्रसिद्ध हॉस्पिटलसमोर बॉम्ब सापडल्याने संपूर्ण प्रशासन हादरून गेले आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Pune News: या वस्तूमध्ये स्फोटक आणि टायमर लावल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहेत.
पुणे:

अजिंक्य धायगुडे-पाटील, प्रतिनिधी

Pune News: पुण्यातील गजबजलेल्या हडपसर परिसरात बुधवारी एकच खळबळ उडाली. येथील कामधेनू इस्टेटमधील एका प्रसिद्ध हॉस्पिटलसमोर बॉम्ब सापडल्याने संपूर्ण प्रशासन हादरून गेले आहे. विशेष म्हणजे राज्यभरात दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) छापेमारी सुरू असतानाच पुण्यात ही घटना घडल्याने याला गंभीर वळण मिळाले आहे. सात तासांचा टाइमर लावलेली ही वस्तू जिवंत बॉम्ब आहे, अशी माहिती या आहे.  बॉम्ब आढळल्याची माहिती समजताच पोलिसांनी परिसराची नाकेबंदी केली आहे. दरम्यान रात्री उशीरा हा बॉम्ब निकामी करण्यात पोलिसांना यश आलं. त्यामुळे मोठी हानी टळल्याचं मानलं जात आहे. 

नेमकं काय घडलं?

हडपसर येथील कामधेनू इस्टेटमध्ये असलेल्या एका मोठ्या रुग्णालयासमोर ही संशयास्पद वस्तू आढळून आली. ही वस्तू बॉम्ब असल्याचा दाट संशय आल्याने तातडीने बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला (BDDS) पाचारण करण्यात आले. 

Advertisement

या वस्तूमध्ये स्फोटक आणि टायमर लावल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, सात तासांचा वेळ सेट करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अग्निशमन दल आणि पोलिसांनी या वस्तूला सुरक्षितपणे एका मोकळ्या जागेत हलवले असून तिथे तपासणी सुरू आहे.

( नक्की वाचा : NEET paper leak : नाव मेडिकलला, पण कनेक्शन पेपर लीकच्या टोळीशी! नाशिकच्या शुभम खैरनारची 'कुंडली' आली समोर )

एटीएसचे राज्यभर छापासत्र आणि पुणे कनेक्शन

पुण्यातील या घटनेला आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे आज सकाळी 8 वाजल्यापासून महाराष्ट्र एटीएसने राज्यभर मोठी कारवाई सुरू केली आहे. पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संबंधित असलेल्या संशयितांवर ही कारवाई केली जात आहे.

पुण्यातील शिरूर, चाकण आणि वारजे परिसरात एटीएसने छापे टाकून काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. मुंबई, अकोला, नांदेड, नाशिक आणि जळगाव या शहरांमध्येही एटीएसने धाडी टाकल्या असून 57 जणांची चौकशी सुरू आहे.

शहजाद भट्टी आणि डिजिटल टेररिझमचा धोका

शहजाद भट्टी हा पाकिस्तानमधील लाहोर येथील अंडरवर्ल्डशी संबंधित गुन्हेगार असून तो दुबईतून आपल्या कारवाया चालवतो. भट्टीवर शस्त्रास्त्रांची तस्करी आणि ग्रेनेड हल्ल्यांचा संशय आहे. 2026 च्या सुरुवातीपासूनच तो भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या निशाण्यावर आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय तरुणांना भडकवणे आणि देशात हिंसाचार घडवून आणणे, असा "डिजिटल टेररिझम" तो चालवत असल्याचा आरोप आहे. आयएसआयशी संबंधित असलेला भट्टी भारतातील विविध गुन्हेगारी नेटवर्कसाठी मध्यस्थ म्हणून काम करत असल्याने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

Advertisement

पुण्यात हाय अलर्ट आणि पुढील तपास

हडपसरमध्ये सापडलेला बॉम्ब वस्तू आणि एटीएसची कारवाई यांचा एकमेकांशी संबंध आहे का, याचा तपास आता पोलीस करत आहेत. सध्या हडपसर परिसर आणि रुग्णालयाबाहेर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या प्रकरणातील संशयितांचे सोशल मीडिया व्यवहार आणि बँक खात्यांचीही पडताळणी केली जात असून, येत्या काही तासांत मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

Topics mentioned in this article