यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी
Pune Crime News Today : पुणे शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे,जी एखाद्या चित्रपटाच्या पटकथेला शोभेल अशी आहे.मृत व्यक्तीच्या नावे बनावट कागदपत्रे तयार करून कोट्यवधींची मालमत्ता हडपणाऱ्या एका सराईत टोळीचा येरवडा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी टोळीच्या मुख्य सूत्रधारासह तिघांना अटक केली आहे.
पुण्यातील येरवडा भागातील आगाखान पॅलेस समोरील सर्व्हे नंबर 2162 मधील मोकळ्या जागेवर या टोळीची नजर होती.ही जागा दिवंगत ब्रिज किशन कोतरू यांच्या मालकीची होती.आरोपींनी संगनमत करून या मृत व्यक्तीच्या नावे बनावट आधारकार्ड,खरेदीखत आणि इतर शासकीय कागदपत्रे तयार केली.या कागदपत्रांच्या मदतीने त्यांनी 'एस.के.ॲग्रोफूड टेक प्रायव्हेट लिमिटेड'या कंपनीच्या मार्फत मालमत्ता हडपण्याचा कट रचला होता.
ही कामगिरी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार,सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा,अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील,उपायुक्त चिलुमुला रजनीकांत आणि साहाय्यक आयुक्त सुनील जैतापकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान,पोलिस उपनिरीक्षक किशोर बेरड,शुभांगी चव्हाण आणि त्यांच्या पथकाने फत्ते केली.सध्या मुख्य आरोपी सुनील कदम याला 29 एप्रिल 2026 पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. या रॅकेटमध्ये अजून किती मालमत्ता हडपल्या गेल्या आहेत,याचा तपास पोलिस करत आहेत.
नक्की वाचा >> Mumbai News: प्रवाशांसाठी खुशखबर! मध्य रेल्वेकडून 34 अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या, पाहा संपूर्ण यादी
असा झाला या प्रकरणाचा खुलासा
या प्रकरणात मृत ब्रिज किशन कोतरू यांचे पुतणे अभिनव श्रीकिसन कोतरू (रा.दिल्ली) यांनी फिर्याद दिली होती.त्यानुसार 18 फेब्रुवारी 2026 रोजी येरवडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने आरोपींना अटक करण्यास सुरुवात केली.
तपासात धक्कादायक माहिती समोर
वजीर अजमुद्दीन शिकलगारला सातारा येथून ताब्यात घेण्यात आले.त्याने कबुली दिली की केवळ त्याला नाममात्र प्रमुख बनवण्यात आले होते. बाळकृष्ण लक्ष्मण दीक्षित (74) हा या प्रकरणातील सर्वांत महत्त्वाचा दुवा ठरला.कसबा पेठेत राहणाऱ्या या 74 वर्षीय वृद्धाने मृत ब्रिज किशन कोतरू यांचे रूपावर (सोंग) धारण केले होते.त्यानेच बनावट दस्तावेजांवर मृत व्यक्ती म्हणून सह्या केल्या होत्या. सुनील कदम उर्फ मिलिंद लक्ष्मण भुसारी (61) हा या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार आहे.पोलिसांनी तब्बल 74 तास पाळत ठेवून त्याला शिवाजीनगर परिसरातून अटक केली.
नक्की वाचा >> Kalyan News: 'राजकारणात चोर आणि शायनर..' जिल्हाप्रमुख छाया वाघमारे भडकल्या, शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
मुख्य आरोपी सुनील कदम हा शहरातील अशा मालमत्ता शोधायचा ज्या मृत व्यक्तींच्या नावावर आहेत आणि ज्यांना कोणी वारसदार नाही.त्यानंतर तो अशा गरीब,गरजू किंवा एकट्या राहणाऱ्या वृद्धांचा शोध घ्यायचा ज्यांचा चेहरा मृत व्यक्तीशी मिळताजुळता असेल.त्यांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून मृत व्यक्तीच्या नावे बनावट स्वाक्षऱ्या आणि अंगठे घेऊन मालमत्तेचे व्यवहार पूर्ण केले जात.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world