जाहिरात

Pune Rave Party : 'माल पाहिजे का'? पोलिसांच्या तपासात खडसेंच्या जावयाबाबत अनेक धक्कादायक गोष्टी उघड

Pune Rave Party : पुण्यातील हॉटेलमध्ये झालेल्या रेव्ह पार्टीबाबत अनेक धक्कादायक खुलासे उघड झाले आहेत. यामुळे एकनाथ खडसे यांच्या जावायाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Pune Rave Party : 'माल पाहिजे का'? पोलिसांच्या तपासात खडसेंच्या जावयाबाबत अनेक धक्कादायक गोष्टी उघड
Pune Rave Party : आरोपींनी ड्रग्ज मागवण्यासाठी वापरलेले चॅटही तपासात उघड झाले आहेत
पुणे:

अविनाश पवार, प्रतिनिधी

Pune Rave Party : पुणे पोलिसांनी 27 जुलै रोजी पहाटे एका हॉटेलमध्ये छापा टाकत रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केला. या प्रकरणात त्यांनी दोन महिलांसह 7 जणांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांचाही समावेश आहे. खडसेंच्या जावायालाच रेव्ह पार्टीत अटक झाल्यानं राज्यभर खळबळ उडाली होती. खडसे यांनी या प्रकरणात षडयंत्र असल्याचा आरोप केलाय. पण, पोलिसांच्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. त्यामुळे खडसेंचे जावाई खेवलकरांच्या अडचणी वाढणार आहेत.

पोलिसांना काय सापडलं?

डॉ. प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपींच्या मोबाईल, लॅपटॉप, पेन ड्राइव्ह्स यांची सायबर फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली आहे.. त्यातून अनेक महिलांसोबतच्या पार्टींचे आक्षेपार्ह व अश्लील व्हिडिओ आणि फोटोंचा साठा समोर आला आहे. हे व्हिडिओ संभाव्य गैरवर्तन आणि बेकायदेशीर कृत्यांची शक्यता दर्शवतात, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

आरोपींनी ड्रग्ज मागवण्यासाठी वापरलेले चॅटही तपासात उघड झाले आहेत. एका सिगारेटच्या फोटोला उत्तर देताना "थेउन घ्या" असे संदेश आढळले. याशिवाय, इंस्टाग्रामवर "माल पाहिजे का?" असा संदेश खेवलकरने एका व्यक्तीस पाठवला होता, ज्यावर "---- वाला?" असा स्पष्ट प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे ड्रग्ज व्यवहाराचे संकेत मिळाले आहेत, अशी माहिती पोलिसांमधील सूत्रांनी दिली. 

( नक्की वाचा : Eknath Khadse : खडसेंचे जावई दर आठवड्याला पार्टी करत होते, पोलीस तपासाचा वाचा Exclusive Report )

हुक्का पुरवठादाराची चौकशी

या पार्टीला हुक्का पुरवठा करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटलीय. राहुल असं त्याचं नाव आहे. राहुल हा अटक करण्यात आलेल्या समीर सय्यद या आरोपीशी संबंधित आहे. राहुलचा मुंबईतील संपर्क क्रमांक आणि पत्ता पोलिसांनी शोधला आहे.

हॉटेल बुकिंगमध्ये काय आढळलं?

पुण्यातील ज्या स्टीवर्ड हॉटेलमध्ये हा सर्व प्रकार सुरु होता, तेथील नोंदीही पोलिसांनी तपासल्या आहेत. त्यामध्ये डॉ. खेवलकरने 2024 आणि 2025 मध्ये अनेकदा  महिलांसोबत पार्टीसाठी खोल्या बुक केल्याचे समोर आले आहे. विशेषत: 25-26 जुलै 2025 रोजी रात्री 11 ते पहाटे 4:50 या दरम्यान दोन महिलांसह पार्टी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणात पोलिसांनी कोकेन, गांजा, हुक्का पॉट, अल्कोहोल, मोबाईल फोन्स, कॅसेट्स, सीसीटीव्ही डीव्हीआर, लॅपटॉप, वाहनं इ. वस्तू जप्त केल्या आहेत. आरोपींचे रक्त आणि लघवी नमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

( नक्की वाचा : Eknath Khadse: '7 जण एका खोलीत बसले म्हणजे...' जावयाच्या अटकेनंतर खडसेंनी विचारला रेव्ह पार्टीवर प्रश्न )

खेवलकरने याआधी एप्रिल, मे आणि जुलैमध्येही स्टीवर्ड हॉटेलमध्ये खोल्या बुक केल्या होत्या. त्यामुळे अशा पार्टींचे आयोजन ही एक सवयीची गोष्ट होती, असा पोलिसांचा संशय आहे.

या प्रकरणात  पुणे, लोणावळा, गोवा आणि मुंबईतील साकीनाका भागात झालेल्या अशाच पार्टींचीही चौकशी पोलीस करत आहेत. पोलिसांनी याप्रकरणी आणखी आरोपी असण्याची शक्यता व्यक्त केली असून, सायबर फॉरेन्सिक आणि सोशल मीडिया चॅटद्वारे संपूर्ण जाळं उघड करण्याची मोहीम सुरु केली आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com