अजिंक्य पाटील, प्रतिनिधी
Pune News : नसरापूर प्रकरण ताजं असताना पुणे शहरातून आणखी एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पुण्यातील पर्वती परिसरात एका ९ वर्षीय चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असून पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतलं आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, पर्वती परिसरातील एका भागात ही घटना घडली. आरोपीने ९ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गाठून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी परिसरातील काही नागरिकांना हा प्रकार संशयास्पद असल्याचं लक्षात आलं. नागरिकांनी तातडीने धाव घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला आणि मुलीची सुटका करण्यात आली.
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, पकडण्यात आलेला संशयित आरोपी हा पीडित मुलीचा सख्खा आजोबा असल्याचं समजते. सख्ख्या आजोबाने नातीसोबत असं कृत्य केल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच पर्वती परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. काही काळ परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संतप्त नागरिकांनी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.