अविनाश पवार, प्रतिनिधी
Pune News: पुणे जिल्ह्यात शाळेत जाणाऱ्या वयाचा निष्पाप चिमुरडा, घराबाहेर पडतो आणि काही वेळातच त्याचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून येतो. ही बातमी वाऱ्यासारखी पसरते आणि संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडते. हा मृत्यू नैसर्गिक आहे की घातपात? या प्रश्नाने ग्रामस्थ सुन्न झाले असून, घटनेच्या गांभीर्यामुळे परिसरात दहशतीचे सावट पसरले आहे.
ही धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील दहिवडी गावामध्ये घडली आहे. येथील वस्तीवर घडलेल्या या प्रकारामुळे सामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
काय आहे प्रकरण?
दहिवडी गावातील साई मांजरे हा मुलगा इयत्ता 6 वी मध्ये शिकत होता. तो तळेगाव ढमढेरे येथील शाळेत आपल्या शिक्षणाचे धडे गिरवत होता. नेहमीप्रमाणे वावरणाऱ्या या मुलाचा अचानक संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आल्याने मांजरे वस्तीवर शोककळा पसरली आहे.
हा मृत्यू केवळ योगायोग आहे की यामागे काही भयानक कट रचला गेला आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, या घटनेने सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांनी आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. केवळ पोलिसच नाही, तर वनविभागाची टीमही घटनास्थळी दाखल झाली आहे. वन्य प्राण्याचा हल्ला की मानवी कृत्य, या दोन्ही बाजू पडताळून पाहण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागल्या आहेत. सध्या मृतदेहाचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू असून, फॉरेन्सिक पुराव्यांचीही मदत घेतली जाण्याची शक्यता आहे.
( नक्की वाचा : Acid Attack: शाळेतून निघाली अन् आयुष्याचं स्वप्न धूसर झालं! संगमनेरमध्ये 11 वर्षांच्या मुलीवर ॲसिड हल्ला )
12 तासांचा अल्टिमेटम
या घटनेमुळे दहिवडी गावातील ग्रामस्थ अत्यंत आक्रमक झाले आहेत. दीड ते दोन वर्षांपूर्वी याच परिसरात अशाच प्रकारची एक घटना घडली होती, ज्याची आठवण झाल्याने लोकांचा संताप अनावर झाला आहे. संतापलेल्या ग्रामस्थांनी आणि नातेवाईकांनी भूमिका घेतली आहे की, जोपर्यंत संबंधित आरोपीला अटक केली जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही. येत्या 12 तासांच्या आत पोलिसांनी ठोस कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली असून, तसे न झाल्यास मोठे आंदोलन उभे करण्याचा इशाराही दिला आहे.
( नक्की वाचा : Pune News: ओळखीच्याच तिघांनी 15 वर्षांच्या मुलीला बनवलं शिकार, पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीतील संतापजनक प्रकार )
तपासाचे आव्हान आणि नागरिकांची मागणी
सध्या साईचा मृतदेह घटनास्थळीच असून नातेवाईक आपल्या मागणीवर ठाम आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे. शिरूर पोलीस आता या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा छडा कसा लावतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.