Pune News : गेल्या काही दिवसात पुण्यातील हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यातही मद्यपान करणं, सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा घालणे अशाही घटना वारंवार होत असतात. मात्र परिणामी सर्वसामान्य नागरिकांना याचा मनस्ताप सहन करावा लागतो. दरम्यान पुणे न्यायालयाने अशा उपद्रवी तरुणांसाठी वेगळी शिक्षा सुनावण्याचं निश्चित केलं आहे.
पुण्यात मद्यपान करून सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्या दोघांना तुरुंगवासाऐवजी कम्युनिटी सर्व्हिस म्हणजे समाजसेवा करण्याची शिक्षा पुणे न्यायालयाने सुनावली आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५५ अंतर्गत दोन्ही आरोपींना एकूण चार दिवस दररोज तीन तास समाजसेवा करण्याचा आदेश अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी विक्रमसिंह भंडारी यांनी दिला.
त्यामुळे आता दोघा आरोपींना शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तीन तास काम किंवा वाहतूक पोलिसांसोबत हजर राहावे लागणार आहे. या आधी ही शिक्षा अल्पवयीन आरोपींना दिली जात होती. मात्र BNS हा नवा कायदा आल्यानंतर या कलमाअंतर्गत कम्युनिटी सर्व्हिस ही पहिलीच शिक्षा पुण्यातल्या या दोन आरोपींना सुनावण्यात आली आहे.
तरुणांची चूक काय होती?
या दोन तरुणांनी मद्यपान करीत शहरात धिंगाणा घातला होता. या प्रकरणी न्यायालयाने दोन्ही आरोपींना नव्या कायद्यानुसार राज्यातील पहिली "कम्युनिटी सर्व्हिस" म्हणजेच समाजसेवा करण्याची शिक्षा सुनावली आहे. पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने राज्यातील पहिलाच निकाल दिला आहे. त्यामुळे पुण्यात तुरुंगाऐवजी दोन आरोपींना पोलीस ठाण्यात चार दिवस दररोज तीन तास काम करण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे.