किशोर बेलसरे, प्रतिनिधी
महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील नाशिक जिल्ह्यात असलेल्या जंगलांमधील मौल्यवान खैराच्या लाकडांची तस्करी करणाऱ्या पुष्पाला वनविकास महामंडळाच्या पथकांने अटक केली आहे. सिनेस्टाईल तस्करी करणारा पुष्पाला वनविभागानेही सिनेस्टाईल पद्धतीनेच जाळ्यात अडकवलं. या पुष्पाला ताब्यात घेतल्यानंतर आंतरराज्यातील रॅकेट उघडकीस आलं आहे.
नाशिक जिल्ह्यातील जंगलांमध्ये स्थानिकांमार्फत घुसखोरी करून खैर, सागाच्या मौल्यवान वृक्षप्रजातीची सर्रासपणे कत्तल करत तस्करी करणारा गुजरातचा कुख्यात तस्कर संशयित नवसूभाई लोहार ऊर्फ पुष्पा यास वनविकास महामंडळाच्या चार पथकाने नाशिक शहरातील पेठनाका येथे सापळा रचून सिनेस्टाइल पद्धतीने जाळ्यात घेतले. न्यायालयाने पुष्पाला पाच दिवसांची वन कोठडी दिली आहे.
सीमावर्ती भागात वनविभाग प्रादेशिक व वनविकास महामंडळाच्या अखत्यारीतील जंगलात घुसखोरी करून तस्करांची टोळी चालविणारा अट्टल नवसूभाई याची वनविभागाकडून मागील अनेक वर्षांपासून शोध घेतला जात होता. प्रादेशिक वनविभागाच्या यादीवर त्याच्याविरुद्ध तीन तर एफडीसीएमच्या यादीवर यापूर्वी पाच असे एकूण आठ आणि स्थानिक पोलीस ठाण्यांत मारहाणीचे दोन असे तब्बल दहा गुन्हे दाखल असल्याचे प्रथमदर्शनी तपासात समोर आले आहे. मागील सहा ते सात वर्षांपासून हा वनविभागाच्या हाती लागत नव्हता. आता वनविकास महामंडळाच्या पथकाने त्याला ताब्यात घेतल्यानंतर आंतरराज्य तस्करीचं रॅकेट देखील उघड होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे गुटखा बनविण्यासाठी या मौल्यवान लाकडाची तस्करी केली जाते.
नक्की वाचा - पुण्यातील स्टिंग ऑपरेशननंतर 'तो' पब सील, 8 जणांविरोधात कारवाई; दोघे निलंबित
नवसुभाई हा गुजरातस्थित दहा ते बारा जणांची टोळी सोबत घेत सीमावर्ती भागात शिरकाव करत होत. यासाठी सीमावर्ती भागातील स्थानिक आदिवासी लोकांची तो मदत घेत होता. वेळेप्रसंगी वनपथकांवर दगडफेक, वृक्षतोड व जंगलात जाण्याच्या व पुष्पा स्टाइल राहणीमान बाहेर पडण्याच्या चोरवाटा दाखविण्यासाठी त्यांचा वापर करत असल्याचे समोर आले आहे. स्थानिकांना प्रतिकिलो 20 ते 25 रुपये प्रमाणे खैराचा मोबदला देऊन गुजरातमध्ये सुमारे 30 ते 40 रुपये प्रतिकिलो या दराने विक्री करत असल्याचे तपासात समोर आलं आहे. सध्या तो नाशिकच्या वन विकास विभागाच्या ताब्यात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world