पुण्यातील कल्याणीनगर परिसरातील एका भरधाव वेगाने जाणाऱ्या पोर्शे कारच्या धडकेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेतील अल्पवयीन आरोपीला अवघ्या 15 तासात जामीन मिळाला. धक्कादायक बाब म्हणजे बाल न्याय मंडळाने त्याला अपघात' या विषयावर निबंध लिहिणे, 15 दिवस वाहतूक पोलिसांसोबत काम करणे आणि येरवडा वाहतूक पोलिसांसोबत वाहतूक नियमन करण्याची शिक्षा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. या प्रकरणात आता राहुल गांधींनी संताप व्यक्त केला आहे.
दोन जणांची हत्या करणाऱ्याला निबंध लिहिण्याची शिक्षा कशी? मग ओला, ट्रक चालकांना निबंध लिहिण्याची शिक्षा देणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. नरेंद्र मोदी दोन हिंदुस्तान तयार करीत आहे, जिथं न्याय देखील श्रीमंतीवर अवलंबून असतो, असं म्हणत राहुल गांधींनी ट्विटरवरून संताप व्यक्त केला.
नक्की वाचा - पुणे अपघातात मोठी अपडेट, फरार झालेल्या विशाल अग्रवाल यांना संभाजीनगरमधून अटक
आज आरोपीला कोर्टात हजर करणार...
दोन जणांची हत्या करणाऱ्या अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल याला पोलिसांनी अटक केली आहे. अल्पवयीन मुलाला वाहन चालवायला दिल्या प्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आज विशाल अग्रवाल यांना कोर्टात हजर करणार असल्याची माहिती आहे. पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात अनिस दुधिया आणि अश्विनी कोस्टा या दोन इंजिनियचा मृत्यू झाला.
देशभरातून संताप...
बिल्डर विशाल अग्रवाल यांच्या सुपूत्राने बेदरकारपणे कार चालवित दोन जणांचा जीव घेतला, मात्र इतका मोठा गुन्हा करूनही त्याला जामीन कसा मिळाला असा सवाल उपस्थित केला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा योग्य प्रकारे तपास केला नसल्याचा आरोपी पुण्याचे काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. या अपघातात मृत्यू झालेल्या अनिस आणि अश्विनीच्या कुटुंबीयांनी आरोपीला कडक शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.