Daughter Killed Mother for Money: एका आईने ज्या मुलीला अवघ्या 6 महिन्यांची असताना दत्तक घेतले, तिला प्रेमाने वाढवले, त्याच मुलीने क्रूरतेचा कळस गाठल्याची घटना समोर आली आहे. प्रियकरासोबत राहण्यासाठी आणि पैशांच्या हव्यासापोटी या मुलीने स्वतःच्या आईची हत्या करण्याचा भयानक कट रचला. विशेष म्हणजे, आईचा जीव घेण्यासाठी तिने चक्क 12 लाख रुपयांची सुपारी दिली आणि हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह चक्क डीप फ्रीजरमध्ये लपवून ठेवला. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
काय आहे प्रकरण?
झारखंडची राजधानी रांचीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे पती वीज विभागात कार्यरत होते आणि 4 वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर पत्नीला साधारण 45 लाख रुपये मिळाले होते. या पैशांवर आणि आईला मिळणाऱ्या पेन्शनवर मुलीची नजर होती.
ही मुलगी आईच्या बँक खात्यातून वारंवार पैसे काढून आपल्या प्रियकराला देत असे. आईला या प्रकाराची कुणकुण लागली, तेव्हा तिने मुलीला पैसे देण्यापासून आणि प्रियकराला भेटण्यापासून रोखले. हाच राग मनात धरून मुलीने प्रियकर अरबाज खान याच्यासोबत मिळून आईचा काटा काढण्याचे ठरवले.
( नक्की वाचा : Kalyan News:पोलिसांच्या श्वानाने 'असा' शोधला खुनी मित्र! कल्याणजवळ नदीकाठी झालेल्या हत्येचा थरारक उलगडा )
कशी केली हत्या?
मुलीला केवळ आईच्या बँक खात्यातील पैसेच नव्हे, तर आईच्या निधनानंतर मिळणारी अनुकंपा तत्त्वावरील नोकरी आणि सर्व मालमत्ता स्वतःच्या नावावर करायची होती. कटानुसार, 24 एप्रिलच्या रात्री प्रियकर अरबाज आपल्या इतर 4 साथीदारांसह घरात शिरला. त्यावेळी ही महिला झोपलेली होती.
आरोपींनी उशीने तोंड दाबून आणि हात-पाय पकडून तिची हत्या केली. यावेळी झालेल्या झटापटीत महिलेच्या गळ्याला गंभीर जखम झाली होती. हत्या केल्यानंतर रक्ताचे डाग लपवण्यासाठी आणि दुर्गंधी येऊ नये म्हणून त्यांनी मृतदेह डीप फ्रीजरमध्ये ठेवला.
( नक्की वाचा : Kolhapur News:नाशिक, अमरावतीनंतर आता कोल्हापूर! प्रेमाच्या जाळ्यात ओढून अश्लील व्हिडिओचं रॅकेट उघड )
असा उघड झाला बनाव
हत्येच्या दुसऱ्या दिवशी मुलीने नातेवाईकांना फोन करून आईचा बाथरूममध्ये पडून मृत्यू झाल्याचा बनाव रचला. नातेवाईक आल्यानंतर घाईघाईत मृतदेहावर अंत्यसंस्कार करून तो दफनही करण्यात आला. मात्र, अंत्यसंस्कारावेळी काही शेजाऱ्यांनी महिलेच्या शरीरावरील आणि गळ्यावरील जखमा पाहिल्या होत्या. हा संशय बळावत गेला आणि माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली. पोलिसांनी तातडीने मुलीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, तिने आपला गुन्हा कबूल केला.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दफन केलेला मृतदेह बाहेर काढला आणि उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला आहे. पोलिसांनी आतापर्यंत मुलीसह 3 जणांना ताब्यात घेतले असून इतर फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी छापेमारी सुरू केली आहे. ज्या मुलीला आईने आपलं मानलं, तिनेच पैशांसाठी आईचा बळी घेतल्याने माणुसकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world