
Gurugram Land Deal Chargesheet : काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांच्या विरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ED) दाखल केलेल्या आरोपपत्रात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. शिकोहपूर जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने PMLA (Prevention of Money Laundering Act) अंतर्गत रॉबर्ट वाड्रा, सत्यानंद याजी, केवल सिंग विर्क आणि इतर काही कंपन्यांवर कारवाई करत न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. हे प्रकरण हरियाणामधील गुरुग्राम येथील शिकोहपूर गावात जमीन खरेदी-विक्री आणि परवाना (लायसन्स) जारी करण्यामधील गैरव्यवहारांशी संबंधित आहे.
1 सप्टेंबर 2018 रोजी हरियाणा पोलिसांनी गुरुग्रामच्या खेडकी दौला पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. यामध्ये रॉबर्ट वाड्रा, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंग हुडा, डीएलएफ कंपनी आणि ओंकारेश्वर प्रॉपर्टीज प्रा. लि. यांच्यासह इतरांवर फसवणूक, कट आणि भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले होते.
3.5 एकर जमीन फक्त 7.50 कोटींमध्ये
स्कायलाइट हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. (SLHPL) या कंपनीकडे खूप कमी भांडवल असूनही, त्यांनी 3.5 एकर जमीन केवळ 7.50 कोटींमध्ये खरेदी केली, ज्याची खरी किंमत 15 कोटी रुपय् होती. सेल डीडमध्ये (विक्री करारामध्ये) चुकीची माहिती देण्यात आली होती की, पेमेंट चेकद्वारे केले गेले, पण तो चेक कधीही वटला नाही. तसेच, सुमारे ₹45 लाख रुपयांची मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्युटी) वाचवण्यासाठी चुकीची माहिती सादर करण्यात आली.
या प्रकरणातील आरोपानुसार रॉबर्ट वाड्रा यांच्या प्रभावाच्या बदल्यात ओंकारेश्वर प्रॉपर्टीजला तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडून गृहनिर्माण परवाना (हाउसिंग लायसन्स) मिळवून देण्यासाठी ही जमीन देण्यात आली. नंतर या जमिनीचा व्यावसायिक परवाना (कॉमर्शियल लायसन्स) मिळवून, दबाव आणि फाइलमध्ये फेरफार करून तो जारी करण्यात आला आणि ती जमीन 58 कोटी रुपयांना DLF कंपनीला विकण्यात आली.
( नक्की वाचा : Rajnath Singh : 'सबके बॉस तो हम हैं', राजनाथ सिंह यांचं नाव न घेता ट्रम्प यांना चोख उत्तर )
58 कोटी रुपयांची बेकायदेशीर कमाई
या परवान्यासाठीच्या अर्जामध्ये 3.53 एकर जमीन दाखवण्यात आली होती, परंतु व्यावसायिक वापरासाठी (कॉमर्शियल यूझसाठी) केवळ 1.35 एकर जमीन होती. सेक्टर रोडवरील जमीन देखील त्यात समाविष्ट करून नियमांकडे दुर्लक्ष करण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दबावामुळे परवाना प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्यात आली. फाइलमधील तारखा बदलल्याचे आणि नकाशात फेरफार केल्याचे पुरावे मिळाले आहेत.
ईडीच्या दाव्यानुसार, रॉबर्ट वाड्रा यांना या व्यवहारातून ₹58 कोटींची बेकायदेशीर कमाई झाली. यापैकी ₹5 कोटी ब्लू ब्रीझ ट्रेडिंग प्रा. लि. (BBTPL) मार्फत आणि ₹53 कोटी स्कायलाइट हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. मार्फत मिळाले. हे पैसे मालमत्ता खरेदी करण्यासाठी, गुंतवणूक करण्यासाठी आणि त्यांच्या कंपन्यांची कर्जे फेडण्यासाठी वापरले गेले. ईडीने PMLA च्या अनेक कलमांसह भारतीय दंड संहितेच्या कलम 423 चा देखील समावेश केला आहे. आरोप सिद्ध झाल्यास 3 ते 7 वर्षांची शिक्षा आणि बेकायदेशीर मालमत्ता जप्त केली जाऊ शकते. आतापर्यंत ईडीने ₹38.69 कोटी किमतीच्या 43 स्थावर मालमत्ता तात्पुरत्या जप्त केल्या आहेत, ज्यात बिकानेर, गुरुग्राम, मोहाली, अहमदाबाद, नोएडा आणि फरिदाबाद येथील जमीन, फ्लॅट आणि व्यावसायिक युनिट्सचा समावेश आहे.
( नक्की वाचा : Devendra Fadnavis: '160 जागा जिंकण्याची हमी', शरद पवारांच्या दाव्यावर फडणवीसांचे उत्तर, म्हणाले... )
घडामोडींचा क्रम
2006–2008: जमीन खरेदी, परवान्यासाठी अर्ज करणे, आणि चुकीची माहिती देऊन फाइल मंजूर करून घेणे.
2008–2012: DLF कडून कोट्यवधी रुपयांचे पेमेंट मिळवणे, परवाना जारी करणे व त्याचे नूतनीकरण करणे, आणि अखेरीस ती जमीन ₹58 कोटींना DLF ला विकणे.
2013: ऑडिटमध्ये या संपूर्ण प्रक्रियेतील गैरव्यवहार उघड झाले.
वाड्रांना कागदपत्रे सादर करण्यात अपयश
सूत्रांच्या माहितीनुसार, गुरुग्राम जमीन व्यवहाराशी संबंधित ईडीच्या चौकशीत रॉबर्ट वाड्रा यांचे दोन जबाब नोंदवण्यात आले आहेत. वाड्रा यांनी पहिला जबाब 15 एप्रिल आणि दुसरा 16 एप्रिल रोजी नोंदवला. सूत्रांनुसार, चौकशीदरम्यान रॉबर्ट वाड्रा यांनी अनेक प्रश्नांची टाळाटाळ करणारी उत्तरे दिली आणि तीन दिवंगत व्यक्तींवर (एच.एल. पाहवा, राजेश खुराना आणि महेश नागर) जबाबदारी ढकलली. वाड्रा म्हणाले की, हे लोक त्यांच्या वतीने काम करत होते.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी या दाव्याची पुष्टी करण्यासाठी रॉबर्ट वाड्रा यांच्याकडे कागदपत्रांचे पुरावे मागितले, तेव्हा ते कोणतेही कागदपत्र सादर करू शकले नाहीत. ईडीच्या सूत्रांनी पुढे सांगितले की, रॉबर्ट वाड्रा यांनी त्यांच्या स्कायलाइट हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. आणि BBTPL या कंपन्यांमार्फत बेकायदेशीर कामांमधून मोठा नफा कमावला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world