एन्काऊन्टर स्पेशालिस्ट म्हणून एकेकाळी ओळख मिरवणाऱ्या आणि सध्या अटकेत असलेल्या सचिन वाझे याने एक पत्र लिहून खळबळ उडवून दिली आहे. पत्रामध्ये त्याने माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले आहेत. एका उद्योगपतीच्या घराबाहेर जिलेटीनच्या काड्या असलेली गाडी सापडली होती. या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIA ने वाझेला अटक केली होती. मनसुख हिरेन यांची हत्या ही देखील याच प्रकरणाशी निगडीत होती.
हे ही वाचा : फडणवीसांच्या सांगण्यावरुन वाझेनी... अनिल देशमुखांचा मोठा आरोप!
हिरेन यांच्या हत्येनंतर पहिल्यांदा वाझे याची गुन्हे शाखेतून बदली करण्यात आली होती. स्फोटके प्रकरणानंतर त्याला निलंबित करण्यात आले होते. याच वाझेने एक पत्र लिहून देशमुखांवर आरोप केलेत. या पत्रात 'मोठे पवार' साहेब आणि 'पाटील' साहेब असा उल्लेख आहे. वाझेच्या पत्रातील या दोन व्यक्ती कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे. "अनिल देशमुख यांच्या काळात गृहमंत्रालयाच्या कामांची पातळी नीच स्तराला गेली होती आणि त्याचा मी देखील बळी आहे" असा वाझेने दावा केला. वाझे याने हे पत्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे. 30 जुलै रोजी लिहिलेल्या हे संपूर्ण पत्र हाती लागले आहे.
वाझेने पत्रात काय म्हटले आहे ?
वाझे याने पत्रात म्हटले आहे की,"अनिल देशमुख यांच्या काळात गृहमंत्रालयाच्या कामांची पातळी ही अत्यंत नीचतम थरावर गेली होती, त्याचा मीही एक बळी आहे माझ्यासारख्या एखाद्या पोलीस ऑफिसरने करू नयेत अशी कित्येक अवैध कामे त्यावेळी देशमुख यांच्या प्रेशर खाली येऊन मला करावी लागली.
मी सीआययुच्या प्रमुखपदी कार्यरत असताना भारतातील आजवरची हुक्का पार्लरवरची सर्वात मोठी कारवाई मी केली. अवैध हुक्का विकणारा भारतातील सर्वात मोठा वितरक आम्ही ताब्यात घेऊन त्याची गोडाऊन सील केली. त्यावेळी त्या मुख्य वितरकास सोडून द्यावे आणि त्या ऐवजी इतर कोणालातरी अटक दाखवावी यासाठी तत्कालीन मंत्री श्री, जयंत पाटील यांनी त्यांच्या शासकीय बंगल्यातून त्यांच्या शासकीय सहकाऱ्यांकरवी माझ्या मोबाईल नंबरवर केलेले संभाषणाचे रेकॉर्डिंग, आदेशांचे रेकॉर्डिंग हा एक मोठा पुरावा ठरू शकेल. माझ्या सीडीआरमध्ये या कॉल्सचे उल्लेख त्याला पुष्टी देऊ शकतील.
हे ही वाचा : 'देशमुख पीएमार्फत पैसे घ्यायचे', वाझेचा पुन्हा लेटर बॉम्ब, देशमुखांचाही पलटवार
माननीय निवृत्त न्यायमूर्ती श्री चांदीवाल यांची समिती ही अनिल देशमुख यांच्या सूचनेनुसार नेमण्यात आली होती. ही बाब समिती समोरच्या देशमुख यांच्या जबाबात स्पष्ट झालेली आहे. चौकशीदरम्यान दबाव टाकण्याचा देशमुख यांचा केविलवाणा प्रयत्न माननीय न्यायमूर्ती चांदीवाल यांनी हाणून पाडला. जबाब देत असता देशमुख यांच्या चाळ यांची नोंद अधिकृतपणे घेण्यात आली आहे.
माननीय चांदीवाल समिती समोर अनिल देशमुख यांना पूर्णपणे तोंडघशी पडले हा कागदोपत्री पुरावा आहे. गृहमंत्री असूनही खात्यांतर्गत विभागांची नावे सांगता न येणे, पोलीस दलाची रचना, पदे याबाबत अनभिज्ञता, प्रशासकीयदृष्ट्या राज्याचे पोलीस महासंचालक हे पद मोठे की मुंबई पोलीस आयुक्त पद मोठे याबद्दलची अनभिज्ञता. अशी अनेक उदाहरणे देशमुख यांच्या जबाबात मिळू शकतील. इतकेच काय तर त्यांचे स्वीय सहाय्यक श्री पालांडे हे देशमुख यांच्याकडे कोणत्याही वैध नेमणुकीशिवाय एक वर्षाहून अधिक काळ कोणत्याही वैध शासकीय आदेशाशिवाय इतक्या महत्त्वाच्या पदावर कार्यरत होते आणि याच पालांडे यांनी अनिल देशमुख यांच्या सांगण्यानुसार 1750 बारचे कलेक्शन देशमुख यांच्यासाठी करण्याचा विषय मी तसंच ACD श्री.संजय पाटील डीसीपी श्री राजू भुजबळ यांच्यासमोर ठेवला याहून अधिक पुरावा काय हवा.
माननीय चांदीवाल समिती चौकशी दरम्यान देशमुख यांनी गोपनीयतेचा भंग केल्याचे सप्रमाण दाखवून दिले आहे देशमुख यांनी पदावनत होऊनही गोपनीय कागदपत्रांच्या प्रती स्वतःजवळ बाळगल्या आणि कु हेतूने गोपनीयतेचा भंग करून ती कागदपत्रे अधिकार नसतानाही उघड केली. सबब अनिल वसंतराव देशमुख यांच्यावर ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल होणे आवश्यक आहे समितीच्या अधिकृत कागदपत्रांच्या प्रमाणीत प्रति माझ्याकडे आहेत.
चांदीवाल समितीचे कामकाज सुरू असण्याच्या कालावधीत मला एका खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आले त्यावेळी कस्टडी दरम्यान ठाण्याचे एक वरिष्ठ अधिकारी आणि अन्य एक वकील शेखर जगताप यांनी चांदीवाल समिती समोर काही विशिष्ट उत्तरे देण्यासाठी दबाव आणला ही बाब मी समिती समोर तसेच माननीय न्यायालयातील माझ्या सविस्तर जबाब सुस्पष्टपणे मांडली आहे.
देशमुख यांनी स्वतःच्या, मोठे पवार साहेब आणि पाटील साहेब यांच्या नावे प्रेशराईज केलेले अनेक जण आहेत अनेक अधिकाऱ्यांकरवी आणि खासगी इसमांकरवी देशमुख टोळीने अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली आणि बढत्यांसंदर्भात करोडो रुपये गोळा केले. काही कामे केलीत पण मेजॉरिटी कामे केलीच नाहीत. याचा बराच निगेटिव्ह परिणाम झाला. सर्वच नावे मला अज्ञात नाहीत आणि जी नावे ज्ञात आहेत ती त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उघड करणे मला संयुक्तिक वाटत नाही. परंतु ठाणे येथील श्री विजय उर्फ बंड्या देशमुख यांना खूप त्रास भोगावा लागला आणि त्याच त्रासिक मानसिकतेतून त्यांनी अनिल देशमुख यांना पाठवलेल्या अनेक whatsapp मेसेज पैकी एक माझ्या या पत्रासोबत जोडला आहे हा संदेश बरेच काही सांगून जातो
माननीय बॉम्बे हायकोर्टाच्या ज्या निरीक्षणाचे उल्लेख अनिल देशमुख करत फिरत असतात तसे उल्लेख करणे म्हणजेच माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा अवमान, आहे ही बाब मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो. संबंधित आदेशाची प्रत मी या पत पत्रासोबत जोडली आहे त्यामध्ये भारताचे माननीय सरन्यायाधीश यांनी सुस्पष्ट केले आहे की बॉम्बे हायकोर्टाच्या कोणत्याही निरीक्षणाचा वापर अनिल देशमुख यांना कोणत्याही कारणासाठी करता येणार नाही. त्यामुळे या मुद्द्यावरून माननीय सुप्रीम कोर्टामध्ये अवमान याचिका तातडीने दाखल करणे आवश्यक आहे असे मला वाटते
महाराष्ट्रासारख्या वैभवशाली राज्याचे गृहमंत्री पद मिळालेल्या व्यक्तीस नार्को टेस्ट काय आहे ती कधी आणि कशी करतात त्याची वैधता काय आणि माननीय सुप्रीम कोर्टाचे काय आदेश आहेत हे अनिल देशमुख यांना माहिती नसणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे तरीही अशी कुठे जर नार्कोटेस्ट होत असेल तर कायदेशीर बाबींच्या अधीन राहून मी या टेस्ट ला तयार आहे माझ्या या पत्राचा सारासार विचार करून याबाबत योग्य ते निर्णय आपण घ्याल अशी मला खात्री आहे."
शिवसेना,भाजपने झाडल्या प्रश्नांच्या फैरी
जर सचिन वाझे नार्को टेस्टला तयार असतील तर अनिल देशमुख नार्को टेस्टला सामोरे का जात नाही ? 'चौकशी होत असेल तर सामोरे जा, निर्दोषत्व सिद्ध करा; घाबरताय कशाला' असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांनी अनिल देशमुखांना विचारला आहे. शिवसेनेचे खासदार मिलिंद देवरा यांनी सचिन वाझेवरून शिवसेना (उबाठा) ला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. देवरा यांनी तीन प्रश्न विचारले आहे. पहिला प्रश्न- सचिन वाझे या निलंबित पोलीस अधिकाऱ्याला 2008 साली शिवसेनेत कोणी घेतला ?दुसरा प्रश्न - मविआ सत्तेत असताना सचिन वाझेला सेवेत परत का घेतले आणि तिसरा प्रश्न -स्फोटके प्रकरणात वाझेला रंगेहाथ पकडला असताना तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्याला क्लिनचीट का दिली ?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world