पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात अदलाबदली केल्या प्रकरणी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक केल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. ससूनच्या फॉरेन्सिक मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे याने रक्ताचा नमुना घेण्याच्या दोन तासांपूर्वी अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांच्यासोबत 14 वेळा फोनवरुन संभाषण केलं होतं.
पोलिसांनी दोघांना स्थानिक न्यायालयासमोर हजर केलं आहे. यादरम्यान पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं की, आरोपीने अल्पवयीनच्या रक्ताच्या नमुन्यात अदलाबदल करण्यासाठी लाच घेतली होती. पोलिसांच्या तपासानुसार, अल्पवयीन मुलाचा रक्ताचा नमुना कचऱ्याच्या डब्यात फेकण्यात आला होता आणि त्याच्याऐवजी ज्या व्यक्तीने अल्कोहोल घेतलं नाही अशा व्यक्तीच्या रक्ताच्या नमुन्याची चाचणी करण्यात आली होती.
काय आहे नवी अपडेट?
पुणे पोलिसांकडून या प्रकरणात सातत्याने नवनवे खुलासे होत आहेत. डॉ. तावरे यांच्या सह आपात्कालिन वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हळनोर आणि रुग्णालयातील शवगृहात काम करणारा अतुल घाटकांबळेशी संबंधित ठिकाणींचा तपास घेतला जात आहे. पोलिसांनी डॉ. हळनोरकडून 2.5 लाख रूपये आणि घाटकांबळेकडून 50 हजार रूपये जप्त केले आहेत.
या प्रकरणाबद्दल बोलताना एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, हळनोर आणि घाटकांबळेकडून जप्त केलेली रक्कम त्यांना या अदलाबदलीसाठी मिळाल्याचं दिसून येत आहे. मात्र तपासाचा मुख्य फोकस डॉ. तावरे यांच्या देवाणघेवाणीवर आहे. त्यांना या प्रकरणात अग्रवाल यांच्याकडून किती पैसे मिळाले किंवा या बदल्यात त्यांना कसलं वचन देण्यात आलं होतं, याचाही तपास सुरू आहे.
नक्की वाचा - महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल अॅक्शन मोडवर, ससूनमधील 'त्या' दोन्ही डॉक्टरांवर कारवाई
डॉ. तावरे तपासाच्या घेऱ्यात...
पोलिसांनी मंगळवारी डॉ. तावरे यांचा संबंध असलेल्या ठिकाणांचा तपास केला. एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती देताना सांगितलं की, तपासात तो रक्ताचा नमुना महत्त्वपूर्ण पुरावा आहे. मात्र तो बदलण्यात आला. नमुदा बदलणे आणि तपासात आडकाठी आणण्याची संपूर्ण आयडिया डॉ. तावरेंची होती.
एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 19 मे रोजी सकाळी 11 वाजताच्या जवळपास ससून रुग्णालयात अल्पवयीन मुलाचा रक्ताचा नमुना घेण्यात आला. डॉ. तावरे यांच्या कॉल डिटेल्सनुसार रक्ताचा नमुना घेण्याच्या दोन तासांपूर्वी व्हॉट्सअॅप, फेसटाइम अशा विविध प्रकारे तावरे आणि अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांच्यात 14 वेळा फोन कॉल झाला. मात्र विशालने तावरेंशी संपर्क कसा केला, आणखी कोणी यामध्ये मध्यस्थी केली का, याचाही तपास केला जात आहे.
(द इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.)