राहुल तपासे, प्रतिनिधी
Satara News : साताऱ्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात निष्काळजीपणाचा कळस पाहायला मिळाला. मृत्यूनंतरही मृत शरीराची हेळसांड झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. वाई तालुक्यातील सोनगिरवाडी येथील २६ वर्षीय आनंद ओव्हाळ आणि आरळे येथील ५१ वर्षीय सुरेश खोमणे या दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाने दोन्ही नातेवाईकांना चेहरा न दाखवता मृतदेह ताब्यात दिले. आणि याच ठिकाणी घडली मोठी चूक.
मृतदेहांची अदलाबदल...
कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मृतदेहांची थेट अदलाबदल झाली. इतकंच नव्हे, तर एका कुटुंबाने चुकीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. चिता पेटल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आणि मग पेटती चिता विझवण्याची वेळ नातेवाईकांवर आली.
या घटनेमुळे कुटुंबीयांचा संताप अनावर झाला असून रुग्णालय प्रशासना विरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सिव्हिल रुग्णालयात गोंधळ निर्माण झाल्याने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. जिल्हा शल्य चिकित्सक युवराज करपे यांना देखील नातेवाईकांनी यावेळी जाब विचारला. यादरम्यान शवविच्छेदन करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश जिल्हा शल्य चिकित्सक युवराज करपे यांनी दिले आहेत. त्यामुळे काही वेळ शासकीय रुग्णालयाच्या आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world