सुजित अंबेकर
महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यात 41 गंभीर प्रकारचे गुन्हे. पोलिसांच्या हातावर तुरी देण्यात माहीर. तब्बल 105 किलो वजन. हे वर्णन आहे सोन्या भोसले या 'वजनदार' आरोपीचे. सातारा एलसीबीच्या जाळ्यात हा चकवा देणारा आरोपी अडकला आहे. 4 पोलिसांनी 1 तास झटापट करत त्याला जेरबंद केले आहे. याने आपली एक टोळी उभा केली होती. विशेष म्हणजे या टोळीत त्याने आपल्याच पै पाहुण्यांना तयार केले होते. या टोळीने महाराष्ट्रासह कर्नाटकात धुडगूस घातला आहे.
सोन्या ऊर्फ सोमा ऊर्फ लाल्या ईश्वर भोसले असे त्याचे पूर्ण नाव आहे. तो मूळचा बेलगाव, तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर येथील आहे. दरोडा टाकणे, गंभीर दुखापत करणे, जबरी चोरी करणे व घरफोड्या करणे हेच त्याचे रेकॉर्ड आहे. सोन्या भोसले याच्यावर अहमदनगर,बीड, नाशिक, वाशी, उस्मानाबाद, सातारा, या जिल्ह्यांत गंभीर गुन्हा दाखल आहेत. याशिवाय कर्नाटक राज्यातही त्यांने घरफोड्या केल्या आहेत. दोन वर्षापासून अनेक पोलिस त्याच्या मागावर असताना तो मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देत होता. अखेर सातारा पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
गुन्हेगारीचे दशक
सोन्या भोसले हा कुख्यात असून 2014 साली त्याने गुन्हेगारी क्षेत्रात पाऊल टाकले. गुन्हेगारीत बस्तान बसल्यानंतर त्याने टोळी बांधताना अजबच आयडिया शोधली. टोळीमध्ये बाहेरचा साथीदार घेण्यापेक्षा चुलत भाऊ, सावत्र भाऊ, पै-पाहुण्यांची टोळी त्याने उभी केली. ते कधी दगा देणार नाहीत असा त्याचा मानस होता. गुन्हेगारीच्या पैशाने ते जगतील आणि त्यांचाच आधार लपण्यासाठीही होईल अशी त्याची रणनिती होती. तपासामध्ये ही बाब समोर आली आहे.
हेही वाचा - महाराष्ट्रातून मोदींच्या मंत्रीमंडळात कोणाला संधी? 'ही' नावे आहेत चर्चेत
एक तास पकडापकडी अन् मोहीम फत्ते...
गस्तीवर असणारे एलसीबीचे फौजदार विश्वास शिंगाडे, पोलिस अमोल माने, केतन शिंदे व शिवाजी भिसे यांना त्याची टीप लागली. या चारही पोलिसांनी इतर कुमक येण्याची वाट न पाहता त्याच्यावर झडप घातली. मात्र चपळ व 105 किलो वजनाचा असल्याने पोलिसांवर मर्यादा येऊ लागल्या. अशातच त्याचे पंटर इतर महिला यांनीही पोलिसांवर हल्ल चढवला. एक तास झटापट केल्यानंतर सोन्या दमला, पण पोलिसांनी त्याला सोडले नाही. शेवटी त्याला पकडण्यात आले.
हेही वाचा - पुरेपूर कोल्हापूर! पैज जिंकली अन् मिळवल्या 8 बोकडाच्या मुंड्या, 32 पाय, रोख रक्कम
बंदूक, कुकरी अन् थरार...
सोन्या भोसले याला दोन वर्षापासून महाराष्ट्राचे पोलिस शोधत होते. एकतर तो सापडत नाही आणि सापडला तर चोरलेल्या सोन्याची रिकव्हरी देत नाही असे त्याचे रेकॉर्ड आहे. सातारा पोलिसांनी मात्र त्याला घाम फोडायचा ठरवले. पोलिस त्याला पकडत असताना त्याने स्वतः जवळील कुकरीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी ती कुकरी ताब्यात घेत फेकून दिली. यावरही तो बधत नसल्याचे पाहून पोलिसांनी बंदूक काढली. यानंतर सोन्या व त्याचे इतर साथीदार नरम पडले. दरम्यान, पोलिसांनी कौशल्य वापरत त्याला बोलते करून सोने रिकव्हरीचाही धडाका केला. आतापर्यंत 21 तोळे जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.