विशाल पुजारी
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापुरात रंगलेल्या पैजा खूप चर्चेत आल्या. काही ठिकाणी लाखो रुपयांच्या पैजा लागल्या तर काही ठिकाणी माझा उमेदवार निवडून नाही आला तर गळ्यात घातलेलं सोनं उतरवणार असं सांगण्यात आलं. सध्या कोल्हापुरातली एक पूर्ण झालेली पैज खूप चर्चेत आलीये. ही पैज आहे आठ बकऱ्यांच्या मुंड्या, 32 पाय आणि रोख रक्कमेची. कोल्हापूर शहरातल्या शाहूपुरी भागातली ही पैज लावण्यात आली होती.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती महाराज आणि महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक अशी कांटे की टक्कर झाली. या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांमध्ये पैजा लागल्याचे चित्र देखील पाहायला मिळालं. अनेक ठिकाणी लाखोंच्या पैज लागल्याचे पाहायला मिळालं. कोल्हापूर शहरातील शाहूपुरी येथील भडका ग्रुपमध्ये एक पैज लागली होती. ही पैज होती शाहू छत्रपती महाराज आणि संजय मंडलिक या दोन्ही उमेदवारांच्या विजयाच्या विश्वासाची. निवडणुकीदरम्यान दोन्ही समर्थकांकडून माझाच उमेदवार निवडून येणार असा विश्वास व्यक्त करण्यात आला. आणि यातच पैज लागली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय होती पैज?
संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेची अशी कोल्हापूर मतदार संघाची निवडणूक ठरली. शाहूपुरीच्या भडका ग्रुप या ठिकाणी शाहू छत्रपती महाराज यांच्या आणि संजय मंडलिक यांच्या समर्थकांनी विजयाची निश्चिती दर्शवली. हा विश्वास व्यक्त करताना दोन्ही गटात जर आपला उमेदवार निवडून आला तर पराभूत उमेदवारांनी आठ बकऱ्यांच्या मुंड्या, 32 पाय आणि 50 हजार रुपये रोख रक्कम देण्याची पैज लावली. तांबडा पांढरा रश्शासाठी नेहमीच चर्चेचा असलेल्या कोल्हापुरात अशी आगळीवेगळी पैज लागल्यामुळे अधिकच रंगत निर्माण झाली.
हेही वाचा - महाराष्ट्रातून मोदींच्या मंत्रीमंडळात कोणाला संधी? 'ही' नावे आहेत चर्चेत
पैज पूर्ण झाल्यावर हलगीच्या तालावर जल्लोष
4 जून रोजी कोल्हापूर मतदारसंघाचा निकाल लागला. या निकालात शाहू छत्रपती महाराज हे प्रचंड मताधिक्यांनी विजयी झाले. या विजयानंतर कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा झाला. याच जल्लोषानंतर शाहूपुरीत लागलेली पैज देखील पूर्ण झाली. ठरल्याप्रमाणे पराभूत उमेदवाराच्या समर्थकांकडून आठ बकऱ्यांच्या मुंड्या 32 पाय आणि पन्नास हजार रोखक रक्कम अदा करण्यात आली. सर्व बकऱ्यांच्या मुंड्या काठीला अडकवून हलगीच्या तालावर नाचत समर्थकांनी जल्लोष केला. याचाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या पैजेचा विषय कोल्हापुरात चर्चेस आला.
हेही वाचा - कोकण पदवीधर मतदार संघातून मनसेची माघार, कारण काय?
समर्थकांसाठी आनंद द्विगुणीत करणारा निकाल
पैज लागल्यानंतर दोन्ही गटात मतमोजणीच्या निकालापर्यंत प्रचंड उत्कंठा वाढली होती. नुकत्याच लागलेल्या निकालानंतर पैजेतल्या सर्व अटी पूर्ण झाल्या. पण विजयी उमेदवारांच्या समर्थकांना या पैजेपेक्षा आपला माणूस खासदार झाला याचा आनंद सर्वात मोठा आहे. पैज तर जिंकलीच पण पाहिजे या गोष्टी देखील मिळाल्या त्यामुळे हा आनंद त्यांच्यासाठी द्विगुणित करणारा होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world