राहुल कांबळे
डोंबिवलीजवळ असलेल्या शीळ-डायघर परिसरातील गणपती मंदिरात पुजाऱ्यांनी विवाहितेवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणाला एक नवं वळण लागलं आहे. नवी मुंबईतील एनआरआय पोलीस ठाण्यात एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मयत महिलेच्या नवऱ्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत महिलेच्या वडिलांनीच हा गुन्हा दाखल केला आहे.
हे ही वाचा - पुजाऱ्याच्या रुपात हैवान! मुंबईतील मंदिरात 30 वर्षीय महिलेवर आळीपाळीने अत्याचार
घरगुती भांडणाला कंटाळलेल्या नम्रता(बदललेले नाव) ही प्रचंड तणावाखाली होती. थोडी शांतता मिळावी यासाठी ती शीळ-डायघर परिसरातील गणेश घोळ मंदिरात (Shilphata Ganesh Temple) गेली होती. येथे मंदिर सांभाळण्यासाठी उत्तर प्रदेश येथून आलेल्या तीन पुजाऱ्यांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार करत तिचा खून केला होता.
मंदिराचे मुख्य पुजारी बालक महाराज उत्तर प्रदेश येथे आपल्या गावी गेले होते. त्यांच्या अनुपस्थितीत हे मंदिर सांभाळण्याची जबाबदारी 3 पुजाऱ्यांकडे देण्यात आली होती. श्यामसुंदर शर्मा, संतोष कुमार मिश्रा आणि राजकुमार पांडे अशी या पुजाऱ्यांची नावे आहेत. 6 जुलै रोजी बेलापूर येथे राहणारी तीस वर्षांची नम्रता सकाळी 10 वाजता गणेश घोळ मंदिरात गेली होती. नम्रता एकटी आहे हे पाहून तीनही पुजाऱ्यांनी कट शिजवला होता. त्यांनी नम्रताशी गोड बोलून दुपारी जेवायला घालून तिचा विश्वास जिंकला होता.
संध्याकाळच्या चहामध्ये भांग मिसळून नम्रता बेशुद्ध झाल्यावर तिघांनी तिच्यावर बलात्कार केला होता. पहाटे शुद्ध आल्यानंतर नम्रताला आपल्यासोबत झालेला प्रकार कळाला, तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली असता तीनही पुजाऱ्यांनी मिळून तिला मारहाण केली आणि ठार मारले. नम्रताचा मृतदेह पुजाऱ्यांनी शेजारच्या जंगलात फेकून दिला होता. या प्रकरणातील तीनही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
नवरा, सासू आणि नणंदेविरोधात गुन्हा
नम्रताच्या मृत्यूला जसे हे आरोपी कारणीभूत आहेत तसेच तिच्या सासरची मंडळीही कारणीभूत असल्याचा आरोप करत नम्रताच्या वडिलांनी नवी मुंबई पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. नम्रताच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की तिचा 10 लाख रुपयांच्या हुंड्यासाठी छळ केला जात होता. कर्ज काढून नम्रताच्या वडिलांनी नम्रताचा नवरा कुणालला पैसे दिले होते. यानंतर नम्रताचा मूल होत नसल्यामुळे छळ केला जात होता. मूल झाल्यानंतरही तिला दिला जाणारा त्रास कमी झाला नव्हता. 6 तारखेला नम्रताने रागाच्या भरात कुणालचे घर सोडले होते. ती मुलासह माहेरी आली होती. याचा राग आल्याने कुणालने आपली बहीण आणि वडिलांसह नम्रताच्या माहेरी जाऊन मुलाला जेवत असताना उचलून आणले होते. याच कारणामुळे नम्रता मानसिकरित्या खचली होती आणि तिने घर सोडलं होतं. नवऱ्यासह सासरच्या मंडळींनी नम्रताला त्रास दिला नसता तर तिच्यासोबत हा प्रकारच घडला नसता असे म्हणत नम्रताच्या वडिलांनी कुणाल, त्याची आई मंदा आणि कुणालची बहीण दीपमाला यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.