राहुल कांबळे, नवी मुंबई
खारघरमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या शहरप्रमुखासह त्याच्या कुटुंबीयांना शुल्लक कारणावरून मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सीआयएसएफच्या 10 ते 15 जवानांकडून शिंदे गटाच्या शहरप्रमुखाला मारहाण करण्यात आल्याची माहिती आहे. या घटनेचा एक व्हिडिओदेखील समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये सीआयएसएफचा जवान शिंदे गटाचा शहरप्रमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण करीत असल्याचं दिसत आहे. या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा - शेकोटीवर हात शेकताना मुली अचानक कोसळल्या, तिघींचाही मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, खारघर सेक्टर 20 मध्ये राहणारे डॉ. श्रीनाथ परब, मित्र जयेश, भाऊ प्रसादसह रात्री दहाच्या सुमारास कारने घरी परतत होते. यावेळी खारघरमधील सीआयएसएफच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसने अचानक डावीकडे बस वळवली. पुढे जाऊन या प्रकाराचा श्रीनाथ परब यांनी जाब विचारला. याचा राग आल्याने गणवेशात असलेल्या 10 ते 15 जवानांनी वाहनातून खाली उतरत तिघांना बेदम मारहाण केली. यावेळी गाडीत अकरा महिन्याच्या बाळासह त्याची आईदेखील होती.
नक्की वाचा - क्रुरतेचा कळस! शेजाऱ्याकडून 9 महिन्याच्या बाळावर कुऱ्हाडीने वार; खळबळजनक घटना
शिवसेना शिंदे गटाचे खारघर शहर प्रमुख प्रसाद परब यांच्यासह वाहनामधील इतरांना मारहाण करण्यात आली आहे. परब कुटुंबीयांना करण्यात आलेल्या मारहाणी विरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास केला जात आहे.