- अशोक खरात याच्यावर महिलांचे लैंगिक शोषण करण्याचे गंभीर आरोप आहेत
- चार वर्षांपूर्वीच्या एका आत्महत्या प्रकरणात खरातचे नाव असून त्याच्या दबावामुळे त्याचे नाव आरोपपत्रातून वगळले
- आत्महत्या केलेल्या विकास दिवटे यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये खरात याचे नाव स्पष्टपणे आहे
सुनिल दवंगे
कथित आध्यात्मिक गुरु अशोक खरात याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आधीच महिलांचे लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात त्याचा पाय खोलात आहे. त्यात आता आणखी एका जुन्या प्रकरणाची भर पडली आहे. त्यामुळे खरात पुरता मजबूत अडकणार हे निश्चित आहे. चार वर्षांपूर्वी घडलेल्या एका आत्महत्या प्रकरणात खरातचे नाव होतं. मात्र त्याच्या दबावामुळे आरोपपत्रातून त्याचे नाव जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा आता नव्याने तपास (Re-investigation) व्हावा, यासाठी फिर्यादी राजेंद्र दिवटे यांनी राहाता न्यायालयात धाव घेतली आहे. शिवाय कोर्टाने ही हा अर्ज स्वीकारला आहे.
एका संस्थेचे कर्मचारी विकास दिवटे यांनी काही वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहीली होती. या सुसाईड नोटमध्ये त्यानी आत्महत्या कुणामुळे करत आहे त्यांची नावे लिहीली होती. त्यापैकी एक नाव हे अशोक खरात याचे होते. त्याच्या नावाचा स्पष्ट उल्लेख त्या सुसाईड नोटमध्ये होते. मात्र,2022 च्या सुमारास खरातचा मोठा दबदबा होता. त्याची राजकीय आणि प्रशासकीय विभागात चलती होती. त्याच्या माध्यमातून त्याने तपास यंत्रणेवर दबाव आणला होता असा आरोप आता होत आहे. त्यातूनच पुढे त्याचे नाव दोषारोपपत्रातून (Charge Sheet) गायब करण्यात आले, असा आरोप फिर्यादींचे वकील गोकुळ ठुबे यांनी केला आहे.
तत्कालीन तपास अधिकाऱ्यांनी दबावाखाली काम केल्याचा संशय व्यक्त करत, या प्रकरणी पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. जर वेळीच कारवाई झाली असती, तर पुढील अनर्थ टळले असते, अशी भूमिका फिर्यादींनी मांडली आहे. न्यायालयाने या अर्जावर सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरच यावर अधिकृत आदेश येण्याची शक्यता आहे. कोर्टाने निर्णय दिल्यास या प्रकरणाचा नव्याने तपास केला जाईल. या प्रकरणात तर एका व्यक्तीचा जीव गेला आहे. त्याने आत्महत्या केली आहे. त्यामुळे अशोक खरातच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यत आहे.
अशोक खरातची एक एक प्रकरणं समोर येत आहे. त्याचे कारनामे पाहून सर्वच जण आवाक झाले आहे. महिलांच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण सध्या गाजत आहे. सुरूवातीला आठ महिलांनी त्याच्या विरोधात तक्रारी केल्या होत्या. आता आणखी महिला त्याच्या विरोधात पुढे आल्या आहेत. त्यात त्याचा मुलगा आणि पत्नी ही फरार झाली आहे. त्याचे आर्थिक घोटाळे ही समोर आले आहे. त्यात आता ईडीने उडी घेतली आहे. त्यामुळे खरातची चार ही बाजून चांगलीच कोंडी झाली आहे. त्यांनी केलेल्या गैरकृत्यांचा एकएक करून उलगडा सध्या होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world