Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर शहरातून एक धक्कादायक आणि तितकीच चिंताजनक घटना समोर आली आहे. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र म्हणजेच ट्रान्सफर सर्टिफिकेट (TC) मिळवण्यावरून झालेल्या वादातून एका अल्पवयीन विद्यार्थ्याने चक्क मुख्याध्यापकांच्या केबिनमध्येच शिक्षकावर चाकूने हल्ला केला. ही संपूर्ण घटना शाळेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
ही धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमधील छावणी (कँटोन्मेंट) भागातील लिटिल फ्लॉवर स्कूलमध्ये घडली. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित अल्पवयीन विद्यार्थी आपले ट्रान्सफर सर्टिफिकेट घेण्यासाठी शाळेत आला होता. हे प्रमाणपत्र मिळवण्याच्या प्रक्रियेदरम्यान त्याचा तिथल्या एका शिक्षकाशी वाद झाला.
हा वाद मिटवण्यासाठी आणि चर्चेसाठी त्याला मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये नेण्यात आले होते. तिथे विद्यार्थी, शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्यात चर्चा सुरू असताना अचानक वाद वाढला आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली.
शाळेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, केबिनमध्ये तिघांमध्ये चर्चा सुरू असताना अचानक विद्यार्थी प्रचंड आक्रमक होतो. तो शिक्षकाला धमकावतो, ज्यामुळे तिघेही आपल्या जागेवरून उभे राहतात. काही सेकंदांतच हा विद्यार्थी खिशातून चाकू काढतो आणि थेट शिक्षकाच्या छातीवर वार करतो.
( नक्की वाचा : Siya Goyal: सिया आणि केतनच्या कारमध्ये काय घडलं? ड्रायव्हरने पाहिलेला तो सीन सियाला जेलमध्ये सडवणार! )
अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे शिक्षक मागे सरकतात आणि केबिनमध्ये एकच गोंधळ उडतो. हल्ला केल्यानंतरही तो विद्यार्थी तिथेच ओरडत राहतो, तितक्यात शाळेतील इतर कर्मचारी केबिनमध्ये धावून येतात आणि त्याला पकडून शांत करण्याचा प्रयत्न करतात.
या जीवघेण्या हल्ल्यात शिक्षक गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे, ती म्हणजे शिक्षकावर हल्ला करण्यासाठी या अल्पवयीन विद्यार्थ्याने वापरलेला चाकू ऑनलाईन साईटवरून मागवला होता. याचा अर्थ तो आधीच तयारी करून शाळेत आला होता.
तसेच, हा विद्यार्थी शाळेत शिकत होता, तेव्हाही त्याचे या वर्गशिक्षकासोबत वाद आणि भांडण झाले होते, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
( नक्की वाचा : Lohagad Fort: लोहगडावरील 'सिया पॉईंट'पाहण्यासाठी देशभरातून गर्दी; 2000 वर्षांच्या इतिहासाला अनपेक्षित वळण )
अल्पवयीन विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने पावले उचलत या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, विद्यार्थ्याची कसून चौकशी केली जात आहे. शाळेसारख्या पवित्र ठिकाणी आणि तेही मुख्याध्यापकांच्या समोर विद्यार्थ्याने शिक्षकावर असा हिंसक हल्ला केल्यामुळे पालकांमध्ये आणि शैक्षणिक वर्तुळात तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.