Pune News: पुणे जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 65 वर्षांच्या नराधमाने अवघ्या 4 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे, पोलीस तपासात हा आरोपी सिरीयल रेपिस्ट असल्याचं उघड झालं असून त्याने यापूर्वी स्वतःच्या पुतणीला आणि एका वृद्ध महिलेलाही आपल्या वासनेचा शिकार बनवलं होतं. या घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
चिमुरडीवर अत्याचार आणि निर्घृण हत्या
मिळालेल्या माहितीनुसार, ही 4 वर्षांची चिमुरडी सुट्ट्या घालवण्यासाठी पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातील नसरापूरमध्ये आजीच्या घरी आली होती. दुपारी घराबाहेर खेळत असताना 65 वर्षांच्या नराधमाने तिला फूस लावून जनावरांच्या गोठ्यात नेलं. तिथे तिच्यावर अत्याचार केल्यानंतर या नराधमाने तिची ओळख पटू नये म्हणून डोक्यात दगड घालून तिची हत्या केली.
एवढ्यावरच न थांबता त्याने या मुलीचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवला. मुलगी बराच वेळ दिसत नसल्याने घरच्यांनी शोधाशोध सुरू केली आणि हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
( नक्की वाचा : JPMorgan :'माझ्यासोबत झोपला नाहीस तर संपवून टाकेन'; बड्या कंपनीच्या महिला बॉसच्या धमकीने भारतीय तरुण उद्ध्वस्त )
सीसीटीव्ही फुटेजमुळे गुन्ह्याचा उलगडा
मुलगी बेपत्ता झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी परिसरात शोध घेतला, तेव्हा ती जनावरांच्या गोठ्यात मृतावस्थेत आढळली. पोलिसांनी तातडीने तपास चक्रं फिरवली आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. या फुटेजमध्ये आरोपी त्या चिमुरडीला गोठ्याकडे घेऊन जाताना स्पष्टपणे दिसून आला. या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी 65 वर्षांच्या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
आरोपीचा भयानक गुन्हेगारी इतिहास
आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर जेव्हा त्याच्या गुन्हेगारी इतिहासाची पडताळणी करण्यात आली, तेव्हा पोलीसही चक्रावून गेले. हा नराधम सराईत गुन्हेगार असून तो सिरीयल रेपिस्ट असल्याचं समोर आलं आहे. यापूर्वी त्याने स्वतःच्या सख्ख्या पुतणीवर अत्याचार केला होता, ज्या प्रकरणात तो जेलमध्ये जाऊन आला होता. इतकंच नाही तर, 75 वर्षांच्या एका वृद्ध महिलेवर बलात्कार केल्याचा गुन्हाही त्याच्यावर दाखल आहे. जेलमधून 5 ते 6 वर्षांपूर्वी सुटून आल्यानंतर त्याने पुन्हा हे भयंकर कृत्य केलं आहे.
(नक्की वाचा : Dhule News: चोराच्या हाताला AI ची साथ; धुळ्यात कोर्टाच्या परीक्षेत कॉपी करण्यासाठी लढवली 'ही' अजब शक्कल )
मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर प्रतिक्रिया दिली आहे. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाईल आणि या नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा मिळावी यासाठी सरकार प्रयत्न करेल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासन खंबीरपणे पाठीशी असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world