गुरुप्रसाद दळवी, सिंधुदुर्ग
Sindhudurg News: वाढदिवसादिवशी महागडा मोबाईल देण्यास नकार दिल्याच्या रागातून २२ वर्षीय युवकाने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जामसंडे येथे घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. आर्यन सुभाष रवंदे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान याबाबत देवगड पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मोबाईल घेण्यास पैसे न दिल्याने आत्महत्या
याबाबत सविस्तर माहिती अशी की, महागड्या मोबाईलच्या खरेदीसाठी आईने पैसे देण्यास नकार दिल्याने एका २२ वर्षीय तरुणाने आपल्या वाढदिवसाच्या दिवशीच गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना देवगड तालुक्यातील जामसंडे सहकारनगर येथे घडली आहे. आर्यन सुभाष रवंदे असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन हा आपल्या आईसोबत जामसंडे येथे राहत होता. त्याची आई मोलमजुरी करून घराचा गाडा हाकत होती, तर आर्यनदेखील वेल्डिंगची कामे करून त्यांना हातभार लावत असे. ५ मार्च रोजी आर्यनचा वाढदिवस होता. या निमित्ताने त्याने आईकडे महागड्या मोबाईलची मागणी केली होती. मात्र, गरिबीमुळे आईने पैसे देण्यास नकार दिला. याच रागातून आर्यनने गुरुवारी रात्री ११.२० वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातील हॉलमध्ये गळफास घेतला.
पोलिसांकडून तपास सुरु
कुटुंबियांनी त्याला तातडीने जामसंडे येथील खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. देवगड पोलिसांनी याप्रकरणाची 'आकस्मिक मृत्यू' म्हणून नोंद केली आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सावंत या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. वाढत्या आभासी जगाच्या ओढीपायी तरुण पिढी टोकाची पावले उचलत असल्याचे या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world