गुरूप्रसाद दळवी, प्रतिनिधी
Sindhudurg News : सृष्टीने धारण केलेलं रौद्ररूप. मुसळधार कोसळणारा पाऊस आणि सोसाट्याचा वारा. समोर अथांग पसरलेला काळोख आणि गडनदीच्या पात्रातून ओसंडून वाहणारे पुराचे पाणी! अशा अत्यंत भयानक आणि मृत्यूच्या दारात उभ्या ठाकलेल्या परिस्थितीतून केवळ अफाट जिद्द, मानसिक धैर्य आणि दैव बलवत्तर म्हणून मालवण तालुक्यातील मसुरे कावावाडी येथील वेदांत विजय हडकर युवक सुखरूप बाहेर पडला आहे. बांदिवडे -भगवंतगड कॉजवेवर रविवारी रात्री घडलेला हा थरार अंगावर काटा आणणारा असून मानवी जिद्द आणि गावकऱ्यांच्या समयसूचकतेचं एक जिवंत उदाहरण ठरला आहे.
वाढत्या पाण्याचा अंदाज चुकला अन्...
आचरा विद्यालयात कॉलेजमध्ये शिक्षण घेणारा वेदांत रविवारी रात्री ८ च्या सुमारास आचऱ्याहून आपल्या मसुरे गावाकडे येण्यास निघाला. दिवसभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बांदिवडे-भगवंतगड यांना जोडणाऱ्या गडनदीवरील कॉजवेवर पाणी चढले होते. संपूर्ण परिसरात रात्रीचा मिट्ट काळोख होता. घरी पोहोचण्याच्या ओढीने वेदांतने त्या वाहत्या पाण्यातूनच आपली मोटरसायकल पुढे काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, पाण्याचा वेग आणि खोलीचा अंदाज न आल्याने शिवाय कॉजवेला संरक्षक कठडा नसल्यामुळे घात झाला! तो आपल्या मोपेडसह थेट गडनदीच्या अथांग आणि वेगवान पात्रात फेकला गेला.
काळोखात मृत्यूशी झुंज...
नदीच्या पात्रात पडताच क्षणार्धात सर्व काही संपल्यासारखं झालं होतं. बाजूला कोणीही नव्हतं, मदतीसाठी हाक मारली तरी ऐकणारं कोणी नव्हतं. अशा स्थितीत गांगरून न जाता वेदांतने कमालीचा धीरोदात्तपणा दाखवला. एका बाजूला पुराचा वेगवान प्रवाह त्याला वाहून नेण्याचा प्रयत्न करत होता, तर दुसऱ्या बाजूला तो जगण्याची लढाई लढत होता. अखेर, पाण्याच्या प्रवाहाशी कसाबसा लढा देत, पोहत त्याने नदीचा किनारा गाठला. मृत्यूला अत्यंत जवळून हुलकावणी देत तो किनाऱ्यावर तर पोहोचला, पण भीती आणि थंडीने तो पूर्णपणे गारठून गेला होता.
गावकऱ्यांच्या रूपाने धावून आले 'देवदूत'-
याच दरम्यान, कॉजवेच्या बांदिवडे किनाऱ्यावर उपस्थित असलेल्या मुरली चिंदरकर यांच्या नजरेस हा प्रकार आला. त्यानी क्षणभरही विलंब न करता भगवंतगड येथील माजी ग्राम सदस्य पप्पू परुळेकर आणि स्थानिक ग्रामस्थांना या घटनेची कल्पना दिली. माहिती मिळताच ग्रामस्थांनी कसलाही विचार न करता, कोसळत्या पावसात तात्काळ भगवंतगड बाजूने धाव घेतली. शोध घेत असताना वेदांत अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत, गच्च भिजलेल्या अवस्थेत रस्त्याच्या कडेला बसलेला दिसून आला. गावकऱ्यांनी त्याला मायेने जवळ केलं, धीर दिला आणि त्याची विचारपूस केली. कॉजवेवरून अजूनही पाण्याचा प्रवाह वाहतच होता, पण गावकऱ्यांनी त्याला धीर देत अत्यंत काळजीपूर्वक चालत पलीकडच्या बाजूला म्हणजेच बांदिवडे येथे आणले आणि सुरक्षितपणे त्याच्या घरी पोहोचवले.
सोमवारी ग्रामस्थांनी गाडी काढली बाहेर...
वेदांत सुरक्षित असला तरी त्याची मोपेड स्कुटी नदीच्या पात्रातच अडकली होती. सोमवारी सकाळी पाऊस थोडा ओसरल्यावर मसूरे भगवंतगड आणि बांदिवडे येथील ग्रामस्थांनी होडीच्या साहाय्याने अथक परिश्रम घेत नदीच्या पात्रातून ही मोटरसायकल ग्रामस्थांनी सुखरूप बाहेर काढली.
धैर्याला सलाम
या संपूर्ण घटनेत वेदांतने दाखवलेले मानसिक धैर्य कौतुकास्पद ठरले आहे. संकटसमयी घाबरून न जाता त्याने घेतलेला योग्य निर्णय त्याच्या प्राणावर बेतलेला प्रसंग टळण्यास कारणीभूत ठरला. या हृदयस्पर्शी घटनेनंतर, "देव तारी त्याला कोण मारी" या उक्तीची प्रचिती आली असून, वेदांतला धीर देण्यासाठी काळोख्या रात्री धावून आलेल्या सर्व ग्रामस्थांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world