सौरभ वाघमारे, सोलापूर:
Solapur MNS Leader Murder Case: महानगर पालिका निवडणुकीत उमेदवारांना बिनविरोध निवडून आणण्याचा धडाका सुरु आहे. शुक्रवारी उमेदवारी अर्ज घेण्याच्या अखेरच्या दिवशी राज्यभरात हायहोल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. याच बिनविरोध निवडणुका करण्याच्या वादातून सोलापूरमध्ये रक्तरंजित थरार पाहायला मिळाला. राजकीय वादातून मनसे पदाधिकाऱ्याची हत्या झाल्याने संपूर्ण सोलापूर जिल्हा हादरुन गेला.
डोळ्यात चटणी टाकून हल्ला
समोर आलेल्या माहितीनुसार, सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला शुक्रवारी रक्ताचे गालबोट लागले आहे. प्रभाग २ मधील उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या वादातून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या खळबळजनक प्रकरणी जेलरोड पोलिसांनी भाजपच्या अधिकृत उमेदवार शालन शंकर शिंदे यांच्यासह एकूण १५ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
VBA Candidate List: वंचित आघाडीच्या 46 उमेदवारांची फायनल यादी समोर; 1 अर्ज बाद; पाहा सर्व उमेदवार
भाजप उमेदवारासह 15 जणांवर गुन्हा
भाजप उमेदवार शालन शिंदे आणि पक्षातीलच दुसऱ्या इच्छुक उमेदवार रेखा सरवदे यांच्यात अर्ज मागे घेण्यावरून तीव्र संघर्ष सुरू होता. या संघर्षात मध्यस्थी करण्यासाठी गेलेले बाळासाहेब सरवदे हे हिंसेचे बळी ठरले. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, आरोपी शालन शिंदे यांनी बाळासाहेब यांच्या डोळ्यात चटणी टाकली, तर इतर आरोपींनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने भीषण वार केले.
या हल्ल्यात बाळासाहेब यांचा मृत्यू झाला असून, त्यांचा भाऊ बाजीराव सरवदे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) १०३, १०९ सह १३ विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एका उमेदवारावरच हत्येचा गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world