Reelstar Rohini Paradhye Death : रील आणि रिअर यामध्ये फरक असतो. बऱ्याचदा रीलवर दिसणारा हसरा चेहरा प्रत्यक्षात काय परिस्थितीतून जात असेल याचा आपण विचारही करू शकत नाही. सोलापुरातील मंढळवेढा तालुक्यातील ब्रम्हपुरीतील प्रसिद्ध रील स्टार रोहिणी पाराध्ये हिच्या आत्महत्येच्या वृत्ताने अनेकांना धक्का बसला आहे. १९ मे रोजी हॉटेल ग्रामपंचायतीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन रोहिणीने शेवटची पोस्ट केली होती. त्यानंतर ७ दिवसात रोहिणीने स्वत: उभ्या केलेल्या हॉटेलमध्ये गळफास घेत स्वत:चा जीव संपवला. या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेक सवाल उपस्थित केले जात आहे. त्याशिवाय तिच्या आत्महत्येमागे अनेक उलटसुलट चर्चाही सुरू झाली आहे.
व्यावसायिक ताणातून रोहिणीचं टोकाचं पाऊल?
रोहिणी आणि तिचा पती नीलेश दोघेही आधी पुण्याला राहत होते. त्यानंतर त्यांनी आपल्या मूळ गावी 'हॉटेल ग्रामपंचायत' नावाचं हॉटेल सुरू केलं. पहिल्या हॉटेलला मिळालेल्या यशानंतर त्यांनी मंगळवेढा तालुक्यातच आणखी दोन ठिकाणी नव्याने हॉटेलच्या शाखा सुरू केल्या. दोन्ही नवीन शाखांचे व्यवस्थापन करणे, त्यांची आर्थिक घडी नीट बसवणे आणि हॉटेल उत्तम रीतीने चालवणे या गोष्टी करताना या दाम्पत्याची मोठी तारेवरची कसरत होत होती. याच वाढत्या व्यवसायाच्या व्यापामुळे आणि आर्थिक गणितांमुळे दोघांमध्ये काही दिवसांपासून वाद आणि मानसिक तणाव निर्माण झाल्याची जोरदार चर्चा आहे. याच रागाच्या भरात रोहिणीने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
स्वयंपाकासाठी कामगार मिळत नसल्याने चिंतेत...
रोहिणी आणि निलेशच्या अनेक रील्समध्ये त्यांनी हॉटेलचा व्यवसाय खूप अवघड असल्याचं म्हटलं आहे. हॉटेल व्यवसाय दिसायला जितका सोपा वाटतो, मात्र प्रत्यक्षात अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं रोहिणी आणि निलेशने अनेक व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. हॉटेलमध्ये भाकरी करण्यासाठी बाई मिळत नसल्याने बहुतांशवेळा रोहिणीलाच सर्व काम करावं लागत असल्याचं दिसतंय. त्यामुळे दाम्पत्य मोठे चिंतेत होते. एका व्हिडिओमध्ये रोहिणी भाकरी करताना दिसत आहे. भाकरी करायला बाई मिळत नसल्याचं निलेश या व्हिडिओमध्ये म्हणतोय. यावेळी रोहिणीच्या चेहऱ्यावरील चिंता स्पष्टपणे दिसून येत आहे.
अनलिमिटेड थाळीचा घाट...
हॉटेल ग्रामपंचायतीमध्ये अनेकदा अनलिमिटेड थाळीची ऑफर दिली जात होती. अनेकदा भाकरी आणि चिकनदेखील अनलिमिटेड पद्धतीने दिलं जात होतं. २६० रुपयात चिकन थाळी अनलिमिटेड दिलं जात होतं. शुक्रवारसाठी ही ऑफर दिली जात होती. या थाळीमध्ये सुकं चिकन, रस्सा, अळणी, भाकऱ्या असा बेत होता. तर काही ठिकाणी ३०० रुपयात अनलिमिटेड चिकन-मच्छी थाळी दिली जात असल्याचंही पाहायला मिळतं.
२६ मे रोजी गळफास घेत संपवलं जीवन...
रोहिणी आणि तिचे पती नीलेश हॉटेलच्या ठिकाणीच एकत्र राहत होते. सोमवारी हॉटेलची साप्ताहिक सुट्टी असल्याने ते बंद होते. मात्र, मंगळवारी नेहमीप्रमाणे हॉटेल उघडलेच गेले नाही. याच दरम्यान, दुपारी एक वाजण्याच्या सुमारास रोहिणीने स्वतःच्या स्वयंपाक खोलीत गळफास घेतल्याचे उघडकीस आले. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिची प्राणज्योत मालवली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world