Thane News : ठाण्यात एका १७ वर्षीय मुलाने मैत्रिणीसोबत झालेल्या वादामुळे तिला पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत मुलगी ८० टक्के भाजली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कापूरबावडी पोलिसांनी याप्रकरणात १७ वर्षीय मुलाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.
कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १७ वर्षीय मुलगी तिच्या कुटुंबासह वास्तव्यास आहे. यापूर्वी ती मुंबईतील चेंबूर भागात कुटुंबासोबत वास्तव्यास होती. त्यावेळी तिची ओळख त्या भागात राहणाऱ्या एका मुलासोबत झाली होती. काही दिवसांपूर्वी मुलगी भाऊबीज निमित्ताने चेंबूर येथे गेली होती. त्यावेळी मुलाने तिच्यासोबत वाद घालून तिला मारहाण केली. तिच्या नातेवाईकांना याबाबत माहिती मिळताच, तिच्या बचावासाठी ते गेले. त्यांनी त्या मुलाला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने मुलीला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली होती. या प्रकारानंतर मुलगी खूप घाबरली होती.
नक्की वाचा - Satara Doctor Death Case : महिला डॉक्टरच्या डायरीत काय दडलंय? अनेक मोठे खुलासे होणार
मैत्रिणीसोबत झालेल्या वादामुळे तिलाच पेटवून दिलं...
२४ ऑक्टोबरला मुलगी तिच्या ठाण्यातील घरामध्ये एकटी होती. त्यानेळी अचानक त्यांच्या घरातून धूर येऊ लागला. या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी तिच्या आईला दिली. मुलीचे कुटुंबीय घरामध्ये आले असता तिचा मित्र घरामध्ये होता. तर मुलगी भाजलेल्या अवस्थेत ओरडत होती. तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मुलीच्या कुटुंबीयांनी याचा जाब मुलाला विचारला असता, तो तेथून निघून गेला. अखेर मुलीच्या आईने कापूरबावडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ चे कलम १०९, ३५१ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघेही एकमेकांना ओळखत असून त्यांच्यामध्ये, वाद झाला होता. मुलीवर उपचार सुरू असून तिच्या जबाबानंतर नेमके कारण स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
