जाहिरात

Thane News : ठाण्यात भाजपाच्या घोड्याचे लगाम कुणी खेचले? गणेश नाईकांच्या 'त्या' वक्तव्याला केळकरांची साथ!

Thane Municipal Election 2026 : भाजपा नेते आणि मंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेली टीका ताजी आहे. हा वाद अद्याप शांत झालेला नसतानाच ठाण्यातील भाजपा आमदार संजय केळकर यांनी शिवसेनेला डिवचणारं वक्तव्य केलं आहे.

Thane News : ठाण्यात भाजपाच्या घोड्याचे लगाम कुणी खेचले? गणेश नाईकांच्या 'त्या' वक्तव्याला केळकरांची साथ!
Thane BJP : ठाणे भाजपा आमदार संजय केळकर यांनी शिवसेनेला डिवचलं आहे.
ठाणे:

रिझवान शेख, प्रतिनिधी

Thane Municipal Election 2026: भाजपा नेते आणि मंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेली टीका ताजी आहे. हा वाद अद्याप शांत झालेला नसतानाच ठाण्यातील भाजपा आमदार संजय केळकर यांनी शिवसेनेला डिवचणारं वक्तव्य केलं आहे. ठाणे महापालिकेत युतीमुळे भाजपाचे नुकसान झाले असून आम्ही स्वतंत्र लढलो असतो तर चित्र वेगळे असते असे स्पष्ट मत भाजपा आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केले आहे.

नवी मुंबई येथील कोकण भवनमध्ये ठाणे महापालिकेच्या 28 नगरसेवकांची गट नोंदणी करण्यासाठी केळकर आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ठाण्यातील राजकीय परिस्थिती आणि गणेश नाईक यांच्या वक्तव्यावर त्यांची रोखठोक भूमिका मांडली. ठाणे महापालिकेत युती करायची नव्हती ही आमची आधीपासूनची भूमिका होती,असे केळकर यांनी स्पष्ट केले. 

मुकेश मोकाशी गटनेते

ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचे 28 नगरसेवक निवडून आल्यानंतर आता पक्षाने महापालिकेत आपली ताकद संघटित करण्यास सुरुवात केली आहे. नवी मुंबईतील कोकण भवन येथे या सर्व 28 नगरसेवकांनी आपली अधिकृत गट नोंदणी केली. 

या प्रक्रियेनंतर भाजपच्या वतीने मुकेश मोकाशी यांची गटनेतेपदी निवड करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. मुकेश मोकाशी हे तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले अभ्यासू लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा विचार करून पक्षाने त्यांच्या खांद्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. या नोंदणी प्रक्रियेसाठी स्वतः आमदार संजय केळकर उपस्थित होते.

( नक्की वाचा : Jitendra Awhad : 'कैसा हराया'! जितेंद्र आव्हाडांच्या हातातून मुंब्रा निसटतंय? वाचा का सुरु झालीय चर्चा )
 

गणेश नाईक यांच्या वक्तव्याचे समर्थन

माजी मंत्री गणेश नाईक यांनी ठाणे आणि आसपासच्या शहरांमधील भाजपच्या स्थितीवर भाष्य केल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती. यावर बोलताना संजय केळकर म्हणाले की गणेश नाईक यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला जात आहे.

 नाईक यांनी जे सांगितले तेच आमचेही म्हणणे आहे. ठाण्यात महायुती झाल्यामुळे भाजपचे मोठे नुकसान झाले आहे. जर आपण स्वतंत्र लढलो असतो तर भाजपला मोठा फायदा झाला असता हे नाईक यांनी वास्तव मांडले आहे. गणेश नाईक यांना 30 वर्षांचा पालकमंत्री पदाचा आणि प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे. जर त्यांना पक्षाने परवानगी दिली असती तर त्यांनी आपली ताकद दाखवून दिली असती असेही केळकर यांनी स्पष्ट केले.

( नक्की वाचा : Raj Thackeray: ठाकरेंचं 'ठरलं'? राज-उद्धव यांच्यातील जवळीक वाढली; महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार? )

विरोधी पक्ष म्हणून काम करावं!

ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर या पट्ट्यात भाजप कार्यकर्त्यांमध्ये युतीबाबत नाराजी असल्याचे संकेत केळकर यांनी दिले. भाजप हा शिस्तीचा पक्ष असल्याने आदेश मानला गेला असला तरी कार्यकर्त्यांची मनस्थिती युतीसाठी अनुकूल नव्हती असे त्यांनी स्पष्ट केले. नाईक यांच्यावर होत असलेल्या खालच्या पातळीवरील टीकेचाही त्यांनी निषेध केला.

महापालिकेत आता भाजपाने सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करावे असे आपले वैयक्तिक मत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र या संदर्भात पक्ष जो अंतिम आदेश देईल तो आम्हाला शिरसावंद्य असेल असेही त्यांनी स्पष्ट केले. ठाणे महापालिकेत स्वबळावर लढलो असतो तर आमचे संख्याबळ शंभरच्या पार गेले असते असा दावा करत त्यांनी स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांच्या भावनांना वाट करून दिली.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com