चोरी करण्यासाठी कोण काय चालाखी करेल काही सांगता येत नाही. ठाणे पोलिसांनी अशाच एका चोराला गजाआड केलं आहे. हा चोर स्वत:ची ओळख लपवण्यासाठी नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे विग वापरून चोरी करीत होता. त्यामुळे त्याचा मागोवा काढणं कठीण झालं होतं. विशेष म्हणजे चोरी केल्यानंतर हा आरोपी विमानाने प्रवास करून दुसऱ्या ठिकाणी पळ काढत होता.
अखेर पोलिसांनी सापळा आखत त्याला ताब्यात घेतलं आहे. आपली मूळ ओळख लपविण्यासाठी विग घालून चोरी करणाऱ्या आणि विमानाने प्रवास करून आपल्या मूळ गावी निघून जाणाऱ्या एका आरोपीस ठाणे गुन्हे शाखेने अटक केली आहे. दरम्यान या आरोपीने ठाणे, मुंबई आणि नवी मुंबई येथे चोरी केली असून आरोपीकडून 62 लाखांचे सोने पोलिसांनी हस्तगत केले आहे.
मूळचा आसाम येथील होजाई जिल्ह्यात राहणाऱ्या आरोपीचे नाव मोईनुल अब्दुल मलिक इस्लाम असं आहे. या आरोपीने ठाणे जिल्ह्यात 19, नवी मुंबई येथे 2 आणि मुंबई येथे 1 अशा 22 घरफोड्या केल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे या आरोपीला मुळातच टक्कल होते. मात्र चोरी करताना तो विग घालून घरफोडी करत असल्याने कोणाच्याही लक्षात येत नव्हते. चोरी करण्याच्या काही दिवस आधी तो मुंबईत येऊन भाड्याने राहत असे. आधी रेकी करून चोरीचा प्लान आखायचा. आणि चोरी केल्यानंतर तो ताबडतोब मोबाइल बंद करून सोन्याची विक्री करीत होता. त्यामुळे त्याचं लोकेशन तपासणंही कठीण झालं होतं. विशेष म्हणजे सोन्याची विक्री केल्यानंतर तो विमानाने गावी पसार होत होता.
मात्र ठाणे गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांना यासंदर्भात माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी त्याच्या मूळ गावी आसाम येथील होजाई पोलिसांच्या मदतीने चौकशी केली. यावेळी तो गावी आल्याचे समजताच पोलिसांनी त्वरित कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. मात्र यावेळी देखील त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता तो फसला अशी माहिती ठाणे पोलिसांनी दिली. सध्या आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. याआधी देखील नवी मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली होती अशी माहिती समोर आली आहे. अधिक तपास ठाणे गुन्हे शाखेतर्फे करण्यात येत आहे.