Mumbai News : बहुचर्चित आणि हजारो लोकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणारा 'टोरेस गुंतवणूक घोटाळा' पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर तब्बल वर्षभराने 'टोरेस इंटरनॅशनल' कंपनी पुन्हा सक्रिय झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे आधीच कोट्यवधी रुपये गमावून बसलेल्या हजारो गुंतवणूकदारांमध्ये पुन्हा एकदा चिंतेचं आणि भीतीचं वातावरण पसरलं आहे.
जुन्या गुंतवणूकदारांना परदेशी क्रमांकांवरून संपर्क
मिळालेल्या माहितीनुसार, या घोटाळ्यातील जुन्या गुंतवणुकदारांना सध्या फोन कॉल, व्हॉट्सअॅप मेसेज आणि एसएमएस येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने इंडोनेशियासह विविध परदेशी क्रमांकांचा वापर केला जात आहे. गुंतवणुकदारांना त्यांची जुनी खाती पुन्हा सुरू करण्यास सांगितलं जात आहे. यासाठी एका नव्याने सुरू करण्यात आलेल्या वेबसाइटवर जाऊन खाते सक्रिय करण्याचं आवाहन केलं जात आहे. गुंतवणुकदारांचे जुने मोबाइल क्रमांक वापरूनच ही खाती पुन्हा सुरू केली जात आहेत. त्यामुळे या हजारो ग्राहकांचा गोपनीय डेटा नेमका कोणाकडे सुरक्षित आहे? आणि तो लीक कसा झाला? याबाबत आता मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
सोशल मीडिया आणि नव्या वेबसाईटचा सुळसुळाट
टोरेसची अधिकृत वेबसाइट, व्हॉट्सअॅप चॅनेल, टेलिग्राम ग्रुप आणि फेसबुक पेजेस पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचा दावा केला जात आहे. गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने पुन्हा एकदा आमिषांचं जाळं विणलं आहे. मोठ्या परताव्याचं आमिष दाखवून गुंतवणुकदारांना पुन्हा सक्रिय करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
जुनी शिल्लक रक्कम पुन्हा उपलब्ध करून दिली जाईल आणि परतावा थेट क्रिप्टो वॉलेटमध्ये जमा होईल, तसेच खरेदी केलेले दागिने आणि मोईसानाईट स्टोन घरपोच दिले जातील, असा दावा कंपनीकडून केला जात आहे.
EOW कडून २७ हजार पानांचे आरोपपत्र दाखल
यापूर्वी या घोटाळ्याचा तपास करताना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात तब्बल २७,१४७ पानांचे अवाढव्य आरोपपत्र दाखल केले आहे. पोलिसांच्या तपासात आतापर्यंत १४,१५७ गुंतवणुदारांची तब्बल १४२.५८ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचं उघड झालं होतं. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ८ आरोपींना अटक केली आहे. या संपूर्ण घोटाळ्यातील मुख्य सूत्रधारांसह ११ आरोपी अद्यापही फरार आहेत. विशेष म्हणजे, या फरार आरोपींमध्ये ८ युक्रेनियन नागरिक, २ भारतीय नागरिक, १ तुर्की नागरिक यांचा समावेश आहे. फरार आरोपी परदेशातूनच हे रॅकेट पुन्हा सक्रिय करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि विशेषतः जुन्या गुंतवणुकदारांनी कोणत्याही नवीन आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन तज्ज्ञांकडून केलं जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world