नाशिकच्या द्वारका उड्डाण पुलावर रविवारी रात्री भीषण अपघात झाला. आयशर आणि टेम्पोमध्ये झालेल्या या भयंकर अपघातात मृतांचा आकडा वाढला असून आतापर्यंत सात जणांना जीव गमवावा लागला आहे. याशिवाय 12 जणं जखमी झाले आहेत.
हा अपघात इतका भयंकर होता की टेम्पोमधील मुलांच्या शरीरात लोखंडी सळ्या घुसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सात तरुणांचा जीव घेऊन फरार झालेल्या ट्रकचालकाला अखेर नाशिक पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. रविवारी अपघातावेळी तो दारूच्या नशेत असल्याची माहिती आहे. ट्रकमध्ये दुसऱ्यांच्या जीवाला धोका होईल अशाप्रकारे लोखंडी सळईंची धोकेदायक वाहतूक केली जात होती.
नक्की वाचा - Nashik accident: नाशिकमध्ये भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू
नाशिक पोलिसांनी लोखंडी सळयांची विक्री करणारा विक्रेता, ट्रकमालक आणि चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत तिघांना अटक केली आहे. अशोककुमार यादव, मनोजकुमार दिमान आणि समीर शहा अशी आरोपींची नावे आहेत. या वाहनात क्षमतेपेक्षा जास्त माल भरला होता. रिफ्लेकटर किंवा इतर कोणतीही सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आलं नसल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. रविवारी रात्री द्वारका परिसरात झालेल्या या विचित्र अपघातात 7 जणांचा मृत्यू तर 12 जखमी झाले आहेत.
नेमकं काय घडलं?
मुंबई आग्रा महामार्गावरील द्वारका उड्डाणपुलावर रात्री आठ वाजता हा अपघात (Nashik Accident) घडला. अपघातामध्ये मृत झालेले आणि जखमी झालेले सर्वजण सिडकोच्या सह्याद्रीनगर परिसरातील रहिवाशी होते. नाशिकमध्ये मुंबई- आग्रा महामार्गावरील द्वारका उड्डाण पुलावर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आयशर ट्रक आणि टेम्पोमध्ये ही भयंकर अपघाताची घटना घडली. या ट्रकमध्ये लोखंडी सळ्या भरल्या होत्या, मात्र वाहनाच्या शेवटी लाल रंगाचे कोणतेही निशाण, चिन्ह किंवा धोक्याचा इशारा देणारे चिन्ह लावले नव्हते. गाडीमध्ये अवजड सामान असताना टेललँम्प किंवा रेडियम लावणे बंधनकारक असते, मात्र असे कोणतेही नियम पाळण्यात आले नाहीत. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या टेम्पोला अंदाज आला नाही आणि गाडी पाठीमागून थेट ट्रकवर आदळली. ही धडक इतकी जोरदार होती की गाडीमधील सळ्या टेम्पोच्या काचा तोडून मुलांच्या शरीरामध्ये शिरल्या. त्यामुळे त्यांच्या शरीरातून प्रचंड रक्तस्त्राव झाला.