
अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले विधानसभा मतदारसंघात आजी-माजी आमदारांच्या राजूर गावात गेल्या पंधरा दिवसांपासून काविळ आजाराने थैमान घातलं आहे. यात दोन मुलींचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासन जागं झालं असून उपाययोजना करत आणि नैतिक जबाबदारी स्वीकारत संतोष बनसोडे यांनी आपल्या उपसरपंचपदाचा राजीनामा दिला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अकोले तालुक्यातील राजूर या गावाला दोन आठवड्यापासून काविळ आजारानं विळखा घातलाय. घरा-घरात लहान मुलं या आजाराने बाधित होत आहेत. सध्या हा आकडा 263 वर पोहोचला असून यात प्रियंका शेंडे आणि मिसबाह शेख या दोन निष्पाप जीवांना आपला प्राण गमवावा लागला आहे. राजूर हे गाव राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार डॉ. किरण लहामटे आणि भाजपचे माजी आमदार वैभव पिचड यांचे मूळगाव आहे. तरीदेखील गावातील पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष झाल्याचं दिसून येत आहे. जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या पाणीपुरवठा योजनेत सुधारणा न झाल्याने स्थानिक स्तरावर संतापाचं वातावरण आहे.
नक्की वाचा - स्वप्न अधूरं राहिलं...हळदीच्या कार्यक्रमात नाचताना नववधुचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
पाणीपुरवठा करणारी पाण्याची टाकी अनेक वर्षांपासून धुतलीच नसल्याचं समोर येत आहे. तर राजूरला पाणी देणारं प्रवरा पात्र आणि जॅकवेलचं पाणी पिण्यास अयोग्य असल्याचं तपासणीत निष्पन्न झालं आहे. पाणी पुरवठा जलशुद्धीकरण प्रकल्प बंद ठेवण्यात आला आहे. याशिवाय थेट आलेलं पाणी नागरिकांच्या घरात सोडलं जात आहे. त्यातूनच आजाराचा उद्रेक झाला असून याची नैतिक जबाबदारी स्वीकारत उपसरपंच संतोष बनसोडे यांनी राजीनामा दिला आहे.
जिल्हा प्रशासनाकडून युद्ध पातळीवर उपाय योजना सुरू आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे, अकोल्याचे विद्यमान आमदार किरण लहामटे माजी आमदार वैभव पिचड यांनी भेट देत आढावा बैठक घेतली. घरा-घरात पाण्याच्या नमुने तपासणी सुरू केली आहे. मात्र पाण्याचा मूळ स्रोत सुरक्षित नाही तर धोका कायम असल्याचं सांगितलं जातंय.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world