मनोज सातवी, प्रतिनिधी
Virar News : विरारमध्ये अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याच्या प्रकरणाला आता नवं वळण लागलं आहे. मुलीला प्रेमाच्या आमिषाने पळवून नेण्यात आल्याचा आणि हा 'लव्ह जिहाद'चा प्रकार असल्याचा आरोप नातेवाईक, मनसे आणि काही हिंदू संघटनांनी करत आरोपीच्या सहकाऱ्याला चांगलाच चोप दिला. मात्र, विरार पोलिसांनी हे सर्व आरोप स्पष्टपणे फेटाळत मुलगी कौटुंबिक कारणांमुळे स्वतःहून घर सोडून गेली होती आणि या प्रकरणात कोणताही आरोपी नसल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या प्रकरणामागील सत्य नेमकं काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बेपत्ता अल्पवयीन मुलीचा नवा सीसीटीव्ही समोर...
विरारमधून १४ जुलैपासून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये संबंधित मुलगी रिजवान नावाच्या तरुणासोबत जाताना दिसत असल्याचा दावा तिच्या नातेवाईकांनी केला आहे. हा सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी नव्हे, तर स्वतः नातेवाईकांनी मिळवून पोलिसांकडे दिल्याचं त्यांनी सांगितलं.
नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, अनेक दिवस पोलीस ठाण्याच्या चकरा मारूनही अपेक्षित कारवाई झाली नाही. त्यानंतर काही हिंदू संघटनांनी स्वतंत्रपणे माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. चौकशीदरम्यान एका सलून चालकाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संबंधित तरुणाशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर काही वेळातच मुलगी एका महिलेसोबत आढळल्याचा दावा करण्यात आला. संबंधित महिला आणि सलून चालकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले, मात्र चौकशीनंतर दोघांनाही सोडून देण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तसेच मुलीच्या वैद्यकीय तपासणीतही विलंब झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मात्र, विरार पोलिसांनी या सर्व आरोपांचे खंडन केले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मुलगी कौटुंबिक कारणांमुळे स्वतःहून घराबाहेर गेली होती. या प्रकरणात कोणताही आरोपी नसून 'लव्ह जिहाद'शी या घटनेचा कोणताही संबंध नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तसेच सरकारी रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे वैद्यकीय तपासणीस विलंब झाल्याचे स्पष्टीकरणही पोलिसांनी दिले आहे.
आता एकीकडे नातेवाईक आणि हिंदू संघटना 'लव्ह जिहाद'चा आरोप करत आहेत, तर दुसरीकडे पोलिसांनी तो स्पष्टपणे फेटाळला आहे. त्यामुळे या प्रकरणातील सत्य नेमके काय, हे पुढील पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.