Vasai News : ग्रामीण आणि आदिवासी भागातील शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे धक्कादायक चित्र वसई तालुक्यातील मांडवी येथून समोर आले आहे. पहिली ते चौथीपर्यंतच्या ३० हून अधिक विद्यार्थ्यांसाठी तब्बल दीड वर्षांपासून केवळ एकच शिक्षक कार्यरत असून दुसरा मंजूर शिक्षक गैरहजर आहे. त्यातच शाळेची इमारत मोडकळीस आल्याने संतप्त पालक आणि ग्रामस्थांनी आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला टाळे ठोकत जोरदार आंदोलन केलं.
एका शिक्षकावर ४ वर्गांचा भार...
मांडवी येथील या शाळेत शिक्षण घेणारे सर्व विद्यार्थी आदिवासी समाजातील आहेत. नियमानुसार दोन शिक्षकांची आवश्यकता असताना एकाच शिक्षकावर चार वर्गांचा भार पडला आहे. उपलब्ध शिक्षकांनाही निवडणूक व अन्य प्रशासकीय कामांमध्ये गुंतवले जात असल्याने नियमित अध्यापन होत नसल्याचा आरोप पालकांनी केला. परिणामी विद्यार्थी शाळेत येतात, मध्यान्ह भोजन करून परत जातात, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
शिक्षकांच्या कमतरतेबरोबरच शाळेच्या इमारतीचीही दुरवस्था झाली आहे. वर्गखोल्यांच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळत असून जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत असल्याची तक्रार पालकांनी केली आहे. याबाबत गटविकास अधिकारी, केंद्रप्रमुख आणि शिक्षण विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप स्थानिक प्रतिनिधींनी केला आहे.
याप्रकरणी प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी दुसरा शिक्षक उपलब्ध करून शाळेची दुरुस्ती करावी, अन्यथा विद्यार्थ्यांना घेऊन शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनातच शाळा भरवण्यात येईल, असा इशारा पालकांनी दिला आहे. दरम्यान, शाळेला टाळे ठोकल्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गाबाहेरच बसावे लागले असून, या आंदोलनामुळे ग्रामीण शिक्षण व्यवस्थेतील गंभीर वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world