हिट अँड रनच्या घटनांनी राज्य हादरलं! विवा महाविद्यालयाची प्राध्यापिकाही ठरली बळी

1 ऑगस्ट रोजी महाविद्यालय सुटल्यावर आत्मजा या विरार पश्चिमेकडील गोकुळ टाऊनशीप येथील आपल्या घरी जात होत्या.

Advertisement
Read Time: 2 mins
विरार:

राज्यभरात हिट अँड रनच्या (Hit and Run) घटना वारंवार समोर येत असल्यामुळे यावर वेळीच कारवाई करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. दोन दिवसांपूर्वी अंबरनाथ-बदलापूर मार्गावर पोतदार इंटरनॅशनल शाळेच्या शिक्षिकेचा हिट अँड रन प्रकरणात मृत्यू झाला होता. त्यामुळे आणखी एका शिक्षिकेचा बळी गेला आहे. 

विरारमध्ये भरधाव फॉर्च्यूनर कारने धडक दिल्याने एका प्राध्यापिकेचा मृत्यू झाला आहे. आत्मजा कासाट (46) असं अपघातात मृत्यू पावलेल्या प्राध्यापिकेचं नाव आहे. आत्मजा कासट या विवा जूनियर (viva college) कॉलेजमध्ये प्राध्यापिका होत्या. 

1 ऑगस्ट रोजी महाविद्यालय सुटल्यावर आत्मजा या विरार पश्चिमेकडील गोकुळ टाऊनशीप येथील आपल्या घरी जात होत्या. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्या घरी परतत असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या एका कारने त्यांना धडक दिली. यात त्या दुभाजकावर फेकल्या गेल्या होत्या. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान रात्री उशीरा त्यांचा मृत्यू झाला. 

नक्की वाचा - पावसाचा आनंद क्षणात विरला! बदलापुरातील पोतदार इंटरनॅशनल शाळेच्या शिक्षिकेचा दुर्देवी अंत

शुभम पाटील (24) नावाचा तरुण यावेळी कार चालवित होता. आरोपी शुभम दारूच्या नशेत कार चालवत असल्याची माहिती आहे. पुणे, वरळी, बदलापूर नंतर आता विरारमध्ये हीट अँड रनची घटना समोर आली आहे. रात्री उशीरा अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता (बी एन एस 2023) च्या 105 आणि 281 कलमांतर्गत तसेच, मोटर वाहन अधिनियम 1988 च्या कलम 184 आणि 185 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Advertisement