पुण्याजवळील पिंपरी-चिंचवड मधून धक्कादायक माहिती समोर येते आहे. वाकड पोलीस ठाण्याने नवजात अर्भकांची खरेदी-विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. सहा महिलांना वाकड पोलिसांनी अटक केली असून या टोळीची काम करायची पद्धत आणि व्याप्ती ही सर्वसामान्यांना चक्रावून सोडणारी आहे. आरोपी महिला पुण्यातील एका सुप्रसिद्ध हॉस्पिटलमधील नर्सच्या मदतीने हे काम करायच्या असं समोर आलं आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात या टोळीने आतापर्यंत सहा नवजात बालकांची विक्री गरजू दाम्पत्यांना केल्याचं समोर आलंय.
काय होती या टोळीची कार्यपद्धती ?
ज्या दाम्पत्यांना व्यंधत्वाची समस्या आहे, अशा दाम्पत्याची माहिती हॉस्पिटलमध्ये काम करणारी नर्स या टोळीतील महिलांना देत असायची. यानंतर या टोळीतील महिला व्यंधत्वाची समस्या भेडसावत असलेल्या जोडप्याची भेट घ्यायच्या. यावेळी जोडप्यांना 5 ते 7 लाखांमध्ये नवजात बाळ देण्याचं प्रलोभन दिलं जायचं. याचदरम्यान टोळीतील काही महिला या आर्थिक दृष्टीने दुर्बल असलेली दाम्पत्य शोधायच्या. ज्या दाम्पत्याकडे दोन पेक्षा अधिक अपत्य आहेत आणि त्यांची परिस्थिती हालाखीची आहे अशांना या महिला आर्थिक प्रलोभन द्यायच्या.
आरोपी महिला कशा लागल्या पोलिसांच्या हातात ?
वाकड पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना आपल्या भागात एक नवजात बालक विक्रीसाठी येणार आहे अशी माहिती कळली. त्यानुसार पोलीस ठाण्याच्या पथकाने सापळा रचला. यावेळी तपासादरम्यान दोन रिक्षांमध्ये सहा महिला संशयास्पदरित्या प्रवास करताना आढळल्या. यातील एका रिक्षेतील महिलेकडे सात दिवसांचं नवजात बालक होतं. पोलिसांनी या महिलांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांना समर्पक उत्तर देता आली नाहीत. यापुढील चौकशीत सदरहु महिलांनी ते बाळ पाच लाखांना विक्रीसाठी आणलं होतं. यानंतर पोलिसांनी IPC च्या 370 (3)(4) कलामाअंतर्गत सहाही महिलांना अटक केली आहे.
अवश्य वाचा - कुटुंबाचं पोट भरण्यासाठी तो झाला रिक्षा चोर, अखेर रिक्षाचालकास अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मागील दीड ते दोन वर्षांपासून ही टोळी पुणे आणि आजुबाजूच्या परिसरात हे काम करायची. या टोळीने आतापर्यंत मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय घरांमध्ये बालकांची विक्री केल्याचंही पोलिसांनी सांगितलं. पुणे जिल्ह्याबाहेर या टोळीचा काही संबंध आलेला आहे का याचा तपास पोलीस करत आहेत.
अवश्य वाचा - धक्कादायक! उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये आला, 3 दिवस बेपत्ता; थेट मृतदेह सापडला