रेवती हिंगवे
लग्न व्हावं. आपल्याला चांगला साथिदार मिळावा ही प्रत्येकाची अपेक्षा असते. सध्याच्या इंटरनेटच्या जगात असाच साथिदार ऑनलाईन शोधला जातो. त्यासाठी अनेक मेट्रोमोनियल साईट उपलब्ध आहेत. पण याच साईटच्या आड अनेक ठग बसले आहेत. ते अशा लोकांच्या शोधात असतात ज्यांना लग्न करण्याची घाई असते. त्यांच्या अपेक्षाही मोठ्या असतात. शिवाय त्या कुणावर ही लगेच विश्वास ठेवतात. अशा लोकांना ते हेरतात आणि त्यांना असं काही ठगतात की आयुष्यभर ते विसरू शकत नाही. असाच एक धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणात एका महिलेकडून तब्बल 3 कोटी पेक्षा जास्त रुपये ऑनलाईन लुटण्यात आले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दिल्लीतील एक महिला पुण्याच्या खराडी भागात राहात होती. ती आपल्या पती पासून विभक्त झाली होती. ती नव्या साथीदाराच्या शोधात होती. त्यामुळे तीनं shaadi.com वर लग्नासाठी प्रोफाईल तयार केला होता. तिच्या या प्रोफाईलमध्ये एका व्यक्तीने इंटरेस्ट दाखवला. ही व्यक्ती ऑस्ट्रेलियन नागरीक असल्याचं त्याने सांगितलं. पण तो मुळचा भारतीय होता. त्याचं नाव डॉक्टर रोहित ओबेरॉय होतं. 2023 मध्ये त्यांची ओळख झाली. ते एकमेकां बरोबर मेसेजवर बोलू लागले. पुढे त्यांच्या चांगली मैत्री ही झाली. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवले. तिचा विश्वासही संपादीत केला.
ट्रेंडिंग बातमी - Plane crash:विमान अपघात रोखण्यासाठी पक्षांची दिशा सरकार बदलणार? पण कशी?
डॉ. रोहित हा काही वेळ पुण्यात आला ही होता. त्यावेळी दोघांची भेटही झाली. पुण्या बरोबर भारतातल्या अन्य शहरात दोघे एकत्र राहीले ही होते. त्याच वेळी या महिले बाबतची सर्व माहिती रोहितने काढून घेतली. ती पतीपासून विभक्त झाली होती. त्यावेळी पोटगी द्वारे तिला जवळपास 5 कोटी रुपये मिळाले होते. या पैशातून तिला लहान मुलांसाठी Mindfullness and spirituality प्रोग्रॅम घ्यायचा होता. याबाबत रोहितला समजले होते. शिवाय तिच्याकडे बरेच पैसे असल्याचं ही त्याला कळलं होतं. त्यातून त्याने तुझा हा बिझनेस आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊ असं त्याने पिडीत महिलेला सांगितलं.
त्यासाठी आंतरराष्ट्रीय फंडीग मिळवून देण्याचं आश्वासन ही त्याने त्या महिलेला दिलं. त्यातून त्याने इव्हॉन हँन्दयानी, विन्सेंट कुआण या व्यक्तीं बरोबर तिचं बोलणं करुन दिलं. ते सिंगापुरचे असल्याचं ही त्याने तिली सांगितलं. तिचा ही त्यावर विश्वास बसला. पुढे तिला या प्रोजेक्टसाठी सीटी बैंक सिंगापूर व भारतातील काही बँका यामध्ये वेळोवेळी पैसे ट्रान्सफर करण्यासाठी सांगण्यात आले. तिने टप्प्या टप्प्याने तब्बल 3 कोटी 60 लाख 18 हजार 540 रुपये इतकी रक्कम वेगवेगळ्या खात्यात जमा केली. त्यानंतर खरा ट्वीस्ट निर्माण झाला. डॉ. रोहित ओबेरॉय हा ऑस्ट्रेलियाला निघून गेला. तिकडे गेल्यानंतर तो त्या महिलेशी बोलणे टाळू लागला.
आपल्याला तोंडाचा कॅन्सर झाला आहे असं त्याने सांगितलं. शिवाय आपली तब्बेत सतत खालावत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने त्या महिले सोबतचा संपर्क कायमचा बंद केला. सप्टेंबर 2024 मध्ये त्याचा पार्टनर विन्सेंट कुआण यांने त्या पिडीत महिलेस एक ईमेल केला. त्यात डॉ. रोहित ओबेरॉय हा मरण पावला आहे असा मेसेज केला. तेव्हा ही गोष्ट त्या महिलेने तिच्या मैत्रीणीला कळवली. त्यावर हे सर्व ठग आहेत. तुझी फसवणूक झाली आहे. त्यानंतर तिने सर्व गोष्टीची पडताळणी केली. आपण फसवलो गेलो आहोत अशी तिला खात्री झाली. त्यानंतर तिने डॉ. रोहित ओबेरॉय, इव्हॉन हॅन्दयानी, विन्सेंट कुआण यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. तांत्रिक विश्लेषणद्वारे या महिलेला फसवणाऱ्या व्यक्तीचे डॉ. रोहित ओबेरॉय हे नाव नसल्याचं समोर आले. त्याचे खरे नाव अभिषेक शुक्ला असून तो मुळचा लखनौचा आहे.
मात्र सध्या तो ऑस्ट्रेलियातील पर्थ इथं राहातो हे स्पष्ट झाले. तसेच आरोपी हा बाहेरील देशात असल्याची माहिती मिळाल्याने त्याच्या नावाचे लुक ऑउट सर्क्युलर तात्काळ जारी करण्यात आले. त्यानंतर 25 जूनला हा आरोपी सिंगापूर वरुन मुंबईला आल्याची खबर मिळाली. त्यानंतर त्याला मुंबई एअरपोर्टवर ताब्यात घेण्यात आले. त्याला पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. आरोपी डॉ. रोहित ओबेरॉय उर्फ अभिषेक शुक्ला याने shaadi.com वर फेक प्रोफाईल तयार केला होता. त्याने त्यावरून एकूण 3,194 महिलांना मेसेज करुन संपर्क केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या आरोपीने आणखी किती महिलांना लग्नाचे आमिष दाखवुन आर्थिक गंडा घातला आहे, याचा तपास पोलिस करत आहेत.