Beed News : बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुली आज जागतिक पातळीवर नाव कमावत आहेत. प्रत्यक्षात त्यांची कोणासोबत तुलना करण्याची आवश्यकता नाही. मात्र तरीही आधुनिक महाराष्ट्रात मुलगा आणि मुलीची तुलना केली जाते. मुलगा घराचा वारसदार आणि मुलगी परक्याचं धन म्हणूनच तिच्याकडे पाहिलं जातं. बीडमध्ये एका महिलेचा अशाच मानसिकतेतून जीव गेला आहे.
या महिलेला तीन गोंडस मुली झाल्या. मात्र सासरच्या मंडळींच्या बुरसटलेल्या मानसिकतेने तिचा छळ केला. मुलगा की मुलगी व्हावी हे आईच्या हातात नसतं. मात्र तरीही मुलींच्या जन्मासाठी तिला बोलणी खावी लागली. शारिरीक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला.
महिलेसोबत नेमकं काय घडलं?
बीडच्या केज तालुक्यातील उंदरी या गावामध्ये एका 25 वर्षे विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणात युसुफ वडगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरुणा ठोंबरे असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. अरुणाला तीन मुली आहेत. मुलगा होत नसल्याने सासरच्या लोकांकडून तिचा छळ केला जात होता. पती उद्धव ठोंबरे हा दारू पिऊन अरुणाला मारहाण करीत होता. तसेच सासू-सासर्याकडून देखील छळ केला जात होता. यामुळेच दिनांक 10 जानेवारी रोजी दुपारी अरुणा ठोंबरे हिने घरातील पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी अरुणाचा भाऊ गोविंद सूर्यवंशी याच्या तक्रारीवरून वडगाव पोलीस ठाण्यात पती उद्धव ठोंबरे, इंदुबाई ठोंबरे आणि सासरा उत्तम ठोंबरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.