संकेत कुलकर्णी, प्रतिनिधी
Solapur News : एसटी बसचा पास नाही. म्हणून कंडक्टरने चक्क पाचवीत शिकणाऱ्या चिमुकल्या मुलाला हायवेवरच लालपरीतून उतरवल्याची घटना शनिवारी संध्याकाळी मंगळवेढ्यात घडली. या घटनेनंतर शालेय शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या प्रवासाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
पाचवीतील चिमुरड्यासोबत नेमकं काय घडलं?
याबाबत सविस्तर माहिती अशी की , मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथील प्रथमेश राहुल पाटील हा पाचवीत शिकणारा मुलगा मंगळवेढा येथे शाळेसाठी नियमित जात असतो. शनिवारी सकाळी त्याच्या पालकांनी त्याला शाळेत सोडलं. शाळा सुटल्यानंतर प्रथमेश घरी येत असताना तो मंगळवेढ्याहून सोलापूरकडे जाणाऱ्या 9405 क्रमांकाच्या एसटी बसमधून प्रवास करीत होता. मंगळवेढा सोलापूर रस्त्यावरील दामाजी कारखाना पाटीच्या पुढे एसटी बस आल्यावर कंडक्टरने पास मागितला. यावर प्रथमेशने दप्तरामध्ये असणारा पास शोधला. मात्र यानंतर त्याच्या लक्षात आले की आपला पास घरीच राहिला आहे. त्याने कंडक्टरला पास घरी राहिल्याचे सांगितले. यावर कंडक्टरने पैसे देऊन तिकीट मागितले. मात्र चिमुकल्या प्रथमेशकडे पैसेही नव्हते. प्रसंगी तुम्ही माझ्या पप्पांना फोन करा...ते तुम्हाला पैसे पाठवून देतील...अशी विनवणी प्रथमेशने केली. मात्र एसटी बसच्या कंडक्टरने मंगळवेढा सोलापूर हायवेवरच एसटी थांबवून प्रथमेशला बसच्या खाली उतरवले. जवळ पैसे नाही... पासही नाही...अशा परिस्थितीत हायवेवर उतरलेला प्रथमेश घाबरला. आणि त्याला रडू कोसळले. काही काळाने त्याने रस्त्यावरील वाहनांना हात दाखवला. आणि आपले मूळगाव असणाऱ्या ब्रह्मपुरीपर्यंत दुचाकीवर जाऊन पोहोचला.
कंडक्टरने कुणाचंच ऐकलं नाही...
महत्त्वाची बाब म्हणजे , एसटी बसमध्ये प्रथमेश शेजारी असणाऱ्या एका महिला प्रवाशाने माझ्याजवळ माझ्या तिकिटाव्यतिरिक्त केवळ 15 रुपये आहेत. हे पैसे घ्या मात्र या चिमुकलेला प्रवास करू द्या. अशी विनंती कंडक्टरला केली. मात्र या विद्यार्थ्याच्या प्रवासासाठी अजून ११ रुपये कमी पडतात. असं सांगत कंडक्टरने महिला प्रवाशाचीही विनंती नाकारली. ही संपूर्ण घटना घडल्यानंतर शनिवारी संध्याकाळी प्रथमेशने आपल्या घरी वडील राहुल पाटील यांना सांगितलं. यानंतर तत्काळ पालकांनी मंगळवेढा आगार प्रमुखांकडे रीतसर तक्रार दिली आहे. यामध्ये मंगळवेढा एसटी आगार आणि एसटी प्रशासनाकडून मंदिर घटनेची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन प्रथमेशच्या पालकांना मिळाले.
शालेय विद्यार्थ्यांना ज्येष्ठ नागरिकांना एसटी महामंडळाने मोफत पासची व्यवस्था केली. मात्र पास नसताना कंडक्टर विद्यार्थ्याला हायवेवर सोडून त्यांच्या जीवाशी खेळला. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचं अशा प्रकारचं कृत्य चुकीचे असल्याचं सांगितलं जात आहोत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world