विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम घोटाळा झाल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आला आहे. त्यामुळे आज विधिमंडळाच्या शपथविधीसाठी मविआचे आमदार उपस्थित नव्हते. त्याशिवाय शरद पवार गटाने या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दरम्यान बीडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या तीन उमेदवारांनी ईव्हीएम पडताळणीसाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज केला आहे. बीडमध्ये सहा विधानसभा मतदारसंघांपैकी राष्ट्रवादी शरद पवार गटाने पाच मतदारसंघात उमेदवार दिले होते. परंतु केवळ एकाच जागेवर शरद पवार गटाचा विजय झाला.
नक्की वाचा - कोरियन ड्रामाच्या फॅन असलेल्या श्रीजयांचं वेगळं रुप, शपथविधीदरम्यान केलेल्या त्या गोष्टीमुळे होतंय कौतुक
पृथ्वीराज साठे, मोहन जगताप आणि मेहबूब शेख यांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे ईव्हीएमच्या बर्न्ट मेमरी पडताळणीसाठी अर्ज केले आहेत. हे अर्ज जिल्हा निवडणूक विभागाने निवडणूक आयोगाकडे पाठवले आहेत. या अर्जावर 45 दिवसानंतर निर्णय होणार आहे.
काय आहे बर्न्ट मेमरी?
बर्न्ट मेमरीमुळे मशीन कायमची लॉक होते. त्यामुळे त्यात फेरफार होऊ शकत नाही. ते 'वनटाइम' वापरासाठी असते. हा प्रोग्राम वाचता येत नाही. त्याशिवाय प्रोग्राम बदलून पुन्हा लिहिता येत नाही. अशा प्रकारे ईव्हीएमचे कोणत्याही प्रकारे पुन्हा प्रोग्रामिंग करता येत नाही. यालाच 'बर्न्ट मेमरी' असे म्हणतात.