जाहिरात
Story ProgressBack

वय वर्ष 99, महाकर्तव्य पार पाडले, दुसऱ्या क्षणाला प्राण सोडले, मतदाराच्या मृत्यूमुळे हळहळ

Read Time: 4 min
वय वर्ष 99, महाकर्तव्य पार पाडले, दुसऱ्या क्षणाला प्राण सोडले, मतदाराच्या मृत्यूमुळे हळहळ
कोट्टायम:

मतदान करणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. या देशाची सत्ता कोणाच्या हातात जावी याचा निर्णय हा भारतातील सामान्य नागरीक घेत असतो. निवडणूक आयोग सातत्याने नागरिकांनी मतदानात सहभागी व्हावे, त्यांनी आपला हक्क बजावावा यासाठी प्रयत्न करत असते. या देशात असे असंख्य नागरीक आहे जे कोणत्याही परिस्थितीत मतदान करतात. केरळमधील एका 99 वर्षांच्या मतदाराला असंख्य व्याधींनी गाठले होते. मात्र ते मतदान करायचेच या हट्टाला पेटले होते. निवडणूक आयोगाने घरातून बाहेर पडू न शकणाऱ्या वयोवृद्ध व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती यांचे मत त्यांच्या घरी जाऊन घेण्यास सुरुवात केली आहे.  त्यानुसार आयोगाचे कर्मचारी या व्यक्तीच्या घरी गेले होते. ए. के. रमण नायर असे या मतदाराचे नाव असून नायर यांनी मतदान केले. त्यानंतर काही क्षणात त्यांनी या जगाचा निरोप घेतला. 

केरळच्या कोट्टायममध्ये राहणारे ए. के. रमण नायर यांच्या घरी शनिवारी म्हणजे 20 एप्रिल रोजी आयोगाचे कर्मचारी त्यांचे मतदान घेण्यासाठी गेले होते. नायर हे वार्धक्यामुळे थकले होते. त्यांना विविध व्याधींनीही त्रस्त केले होते. दोन दिवसांपूर्वीच ते रुग्णालयातून घरी परतले होते. आपल्या नातवासह राहणाऱ्या नायर यांना मतदान करण्याची तीव्र इच्छा होती. त्यांची ही इच्छा आयोगाने सुरु केलेल्या निर्णयामुळे पूर्ण झाली. आयोगाचे कर्मचारी नायर यांच्या घरी गेले होते. कर्मचारी नायर यांच्या घरी गेले तेव्हा ते जेवत होते. जेवणानंतर आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी नायर यांचे मत नोंदवून घेतले. मत नोंदवल्याच्या काही मिनिटांमध्येच नायर यांचे निधन झाले. नायर यांना मत देण्याची अत्यंत प्रबळ इच्छा होती, मात्र प्रकृतीमुळे आपण मतदानासाठी जाऊ शकू की नाही अशी चिंता नायर यांना सतावत होती. 

तुम्हालाही मतदान करायचे आहे मात्र मतदार यादीत नाव नाही ?

निवडणूक काळात प्रत्येक टप्प्यावर नामांकनाच्या अखेरच्या दिवसाच्या साधारण 10 दिवस आधीपर्यंत मतदार नोंदणीसाठी आलेले अर्ज हे मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याच्या दृष्टीने विचारात घेतले जातात. या अर्जांची आणि पुरावा म्हणून जोडलेल्या दस्तऐवजांची पडताळणी करण्यासाठी व हरकती मागवण्यासाठी हा साधारण 10 दिवसांचा कालावधी गृहीत धरला गेला आहे.

महाराष्ट्रामध्ये पाचव्या टप्प्यात   20 मे रोजी  धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर- मध्य, मुंबई दक्षिण- मध्य आणि  मुंबई दक्षिण या 13 मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. या मतदारसंघांसाठी नामनिर्देशन सादर करण्याची अखेरची तारीख 3 मे 2024 आहे.

त्यानुसार, या लोकसभा मतदार संघातील ज्या पात्र नागरिकांनी 1एप्रिल 2024 रोजीपर्यंत आपल्या वयाची 18 वर्षे पूर्ण केलेली असतील व त्यांचे नाव अद्याप मतदार यादीत समाविष्ट झालेले नसेल, अशा नागरिकांनी या मतदारसंघामध्ये नवीन मतदार नोंदणीसाठी 22 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज केल्यास (ऑफलाइन तसेच ऑनलाइन पद्धतीने) त्यांची नावे मतदार यादीत (अन्यथा पात्र असल्यास) समाविष्ट होऊ शकतील. यामुळे सर्व पात्र नागरिकांनी मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, हे तपासून, जर नाव नसल्यास त्वरीत 22 एप्रिल 2024 पर्यंत मतदार नोंदणीचा अर्ज क्र. 6 भरावा, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडून करण्यात आले आहे.

मतदार यादीत नाव कसे तपासायचे?

तुम्ही voters.eci.gov.in हे संकेतस्थळ किंवा Voter Helpline अॅपचा वापर करून मतदार यादीत तुमचे नाव शोधू शकता

वैयक्तिक तपशिलाच्या पर्यायांतर्गत नाव, आडनाव, वडील किंवा पतीचं नाव, वय, लिंग, राज्य, जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघ या तपशिलाच्या आधारे किंवा मतदार ओळखपत्र क्रमांकाच्या आधारे किंवा मोबाइल क्रमांकाच्या आधारे ( तो जर तुमच्या मतदार ओळखपत्राशी जोडला असेल तर) किंवा Voter Helpline App वर मतदार ओळखपत्रावरील क्यू आर कोड स्कॅन करूनही मतदार यादीत आपले नाव शोधता येते.

मतदार नोंदणीचा अर्ज कसा भरावा

अर्ज क्र. 6 - नवमतदार नोंदणी

ऑनलाइन पद्धतीने - voters.eci.gov.in हे संकेतस्थळ किंवा Voter Helpline App चा वापर करून मतदार नोंदणीचा अर्ज भरा

ऑफलाइन पद्धतीने- आपले छायाचित्र, तसेच वय आणि सर्वसाधारण निवासाच्या स्वतःची स्वाक्षरी असलेल्या पुराव्यासह आपल्या जवळच्या मतदार नोंदणी कार्यालयाला भेट द्या. अधिक तपशिलांसाठी लिंक:  https://ceoelection.maharashtra.gov.in/SearchInfo/VHCs.aspx

मतदार नोंदणीच्या अर्जासोबतच वयाचा पुरावा म्हणून जन्माचा दाखल, भारतीय पासपोर्ट, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, दहावी किंवा बारावीचे निकालपत्र या दस्तऐवजांपैकी कोणताही एक दस्तऐवज जोडता येईल.

मतदार नोंदणीच्या अर्जासोबतच सर्वसाधारण निवासाचा पुरावा म्हणून भारतीय पासपोर्ट, आधारकार्ड,  राष्ट्रीय, श्येड्युल्ड बँक किंवा टपाल विभागाचे खात्याचे चालू पासबूक, पाणी, वीज तसेच स्वयंपाकाच्या गॅस जोडणीचे किमान एका वर्षाच्या आतील देयक,  नोंदणीकृत भाडे करार, नोंदणीकृत विक्री करार या दस्तऐवजांपैकी कोणताही एक दस्तऐवज जोडता येईल.

voters.eci.gov.in हे संकेतस्थळ तसेच Voter Helpline या अॅपवरून मतदार नोंदणीचा अर्ज क्र. 6 कसा भरावा, मतदार यादीत नाव कसे तपासायचे याचे मार्गदर्शनपर व्हिडिओ मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या CEO Maharashtra या युट्यूब वाहिनीवर उपलब्ध आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination