अकोला लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. प्रचाराची रणधुमाळी संपण्यास आता 2 दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे प्रचार चांगलाच रंगात आलाय. प्रचारातील शेवटच्या रविवारी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याचा सर्व उमेदवारांनी प्रयत्न केला.
मोदीभक्त अपक्ष
आचार्य दिप असं या अपक्ष उमेदवाराचं नाव आहे. ते स्वत: ला मोदी भक्त आणि मोदी समर्थक मानतात. संपूर्ण भगवे वस्त्र, साधूसारखी दाढी ही त्यांची वेशभूषा अकोलाकरांचे लक्षवेधून घेत आहे. आपण स्वत: कट्टर हिंदुत्ववादी आहोत. निवडून आल्यानंतर आपलं समर्थन पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच असेल, असं त्यांनी जाहीर केलंय.
(नक्की वाचा : तिरंगी लढतीमध्ये इतिहास बदलण्याचं आंबेडकरांसमोर आव्हान )
राज्यात भारतीय जनता पक्ष-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस ही महायुती एकत्र लोकसभा निवडणूक लढवत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महायुतीचे स्टार प्रचारक आहेत. अकोला हा तर भाजपाचा बालेकिल्ला समजला जातो. इथं 2004 पासून सातत्यानं भाजपाचा उमेदवार निवडला गेला आहे. महायुतीमधील जागावाटपामध्येही अकोला भाजपाकडेच आहे. भाजपा उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारातही पंतप्रधान नरेंद्र मोदींचं काम हाच मुख्य मुद्दा आहे. त्याचवेळी मोदींच्या नावानं मत मागणारे आचार्य दीप देखील मैदानात असल्यानं या रंगत निर्माण झाली आहे.
माझा पाठिंबा पंतप्रधान मोदी यांनाच असेल. 'मोदी-भक्त-मोदी समर्थन' या आशयाचे फलक लावून ते प्रचार करत आहेत. मोदींसोबत काम करण्याचं माझं स्वप्न आहे, असंही आचार्य दीप सांगतात. त्यांना 'हिरा' हे निवडणूक चिन्ह मिळालं आहे.
( नक्की वाचा : आंबेडकरांना धक्का! वंचितमध्ये फूट? 'या' जिल्ह्यात फटका बसणार? )
कोण आहेत आचार्य दीप?
रत्नदीप सुभाषचंद्र गणोजे असं आचार्य दीप यांचं मूळ नाव आहे. बी. ए. आणि बी. एड. पर्यंत त्यांचं शिक्षण झालंय. अकोला शहरातील डाबकी रोड भागातील ते रहिवासी आहेत. आचार्य दीप 2006 पासून शाळा चालवतात. त्यांच्या शाळेत 282 मुलं असून प्रत्येक विद्यार्थी दोन्ही हातांनी लिहितो. ते विश्व हिंदू व्यापार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. ही संस्था हिंदू एकत्रीकरणाचं काम करते. हिंदुतत्वादी चेहरा असलेले आचार्य या निवडणुकीत किती मतं मिळवतात हे 4 जून रोजी स्पष्ट होईल.