आदित्य ठाकरे यांनी रामदास कदम यांच्या गडात त्यांना आव्हान दिले. दापोली इथे झालेल्या सभेत त्यांनी रामदास कदम यांना बरचं काही सुनावलं. शिवाय ज्यांना आपलं समजलं, त्यांना एका रात्रीत खोके दिसले. त्यालाच त्यांनी ओके केलं असं म्हणत रामदास कदमांवर आदित्य ठाकरे यांनी हल्लाबोल केला. रामदास कदम आणि त्यांचा मुलगा योगेश यांचा उल्लेख त्यांनी गद्दर म्हणून केला. शिवाय मतदार संघात जर कोणी गुंडगिरी करत असेल तर सरकार आल्यानंतर त्यांचा बंदोबस्त करू असेही आदित्य यावेळी म्हणाले. दापोली मतदार संघात शिवसेना ठाकरे गटाचे संजय कदम रिंगणात आहेत. त्यांच्या समोर रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम हे शिवसेना शिंदे गटाकडून मैदानात आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दापोलीच्या सभेत आदित्य ठाकरे यांनी रामदास कदम यांचा चांगलाच समाचार घेतला. संघर्ष आणि लढाई शिवसेनेच्या नशिबात आहेत. ती लढाई आपण लढत असल्याचं ते म्हणाले. ज्या लोकांना आपले समजले. आपल्या परिवारातले समजले. काहींना काका समजलो. त्यांच्या मुलांना मित्र समजत होते. पण त्यांना खोके दिसले. त्यालाच त्यांनी एका रात्रीत ओके केले. रातोरात आपले होते ते परके झाले. इथं ही एक गद्दार आहे असं म्हणत त्यांनी कदम पिता पुत्रावर हल्ला चढवला. नाटक करणारा गद्दार, टीव्हीवर रडणारा गद्दार, आवाज चढवून बोलणारा गद्दार, शिविगाळ करणारा गद्दार, धमकावणारा गद्दार असा उल्लेख आदित्य यांनी केला.
ट्रेंडिंग बातमी - सातारा जिल्ह्यातील अपक्ष उमेदवार कोणाचे गणित बिघडवणार?
या गद्दारांना, चिंधिचोरांना गुंडाना तुम्हा घाबरणार आहात का असा प्रश्नही आदित्य यांनी यावेळी केला. जे दादागिरी करतील, काही गल्लीतल्या गुंडांना वाटत असेल आपण डॉन आहोत. त्यांना नीट सांगायला आलोय. जर कोणत्या शिवसैनिकावर हात उचलला, तसा प्रयत्न जरी केला तर त्यांना बर्फाच्या लादीवर झोपवण्याची जबाबदारी माझी. असं सांगत त्यांनी कदम पिता पुत्राला नाव न घेता इशारा दिला. या गुंडगिरीला न घाबरता शिवसेना ठाकरे गटाच्या मशालीला मतदान करा असे आवाहन आदित्य यांनी या सभेत केले.
ट्रेंडिंग बातमी - 'आयुष्यात कधी संविधान वाचलं नाही', राहुल गांधींचा PM मोदींना टोला
या मतदार संघात जे गद्दार आहेत. त्यांची गुंडगिरी चालते. त्यामुळे इथल्या भाजपच्या लोकांना आणि संघाच्या लोकांना प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला ही गुंडगिरी मान्य आहे का? शिवाय मागिल अडीच वर्षात इथल्या भाजपवाल्यांना काय मिळालं असा प्रश्नही आदित्य यांनी यावेळी केला. अलीबाबा आणि चाळीस चोरांचे हे सरकार आहे.त्यातून तुम्हाला काय मिळाले असंही ते म्हणाले. बटें गे तो कटेंग बाबतही यावेळी आदित्य म्हणाले. मी त्याच्याशी सहमत आहे. या खोके सरकार विरोधात बटेंगे तो कटेंगे हे खरं आहे असं आदित्य म्हणाले. त्यामुळे सर्वांनी या सरकार विरोधात एक व्हा असं त्यांनी सांगितलं.
ट्रेंडिंग बातमी - शरद पवारांनी जाहीर केली मुख्यमंत्रीपदाबाबत भूमिका, उद्धव ठाकरेंचे टेन्शन का वाढले?
शिंदे सरकारमध्ये असे दोन मंत्री आहेत, त्यांनी महिलांबाबत वाईट वक्तव्य केली आहेत. त्यात एक अब्दुल सत्तार आहेत. तर दुसरे संजय राठोड आहे. अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंना थेट शिव्या दिल्या आहेत. तर राठोड यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप झाला आहे. अशा वेळी हे तुमचे लाडके भाऊ होवू शकतात का असा प्रश्न त्यांनी उपस्थित महिलांना केला. हे आता अंतिम लढाई आहे. या लढाईसाठी तयार रहा. ज्यांनी गद्दारी केली त्यांना धडा शिकवा असे आवाहन यावेळी आदित्य ठाकरे यांनी दापोलीतल्या सभेत केले.