योगेश शिरसाट, प्रतिनिधी अकोला.
Akola Municipal Corporation Election : महापालिका निवडणूक जाहीर होताच अकोला शहरातील राजकीय वातावरण तापले असून तिकीट वाटपावरून पक्षांतर्गत वाद, नाराजी आणि आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. कुणाला तिकीट मिळते तर कुणाचे कापले जाते आणि त्यातून राजीनाम्यांची भाषा ऐकू येते. मात्र यावेळी शिंदे शिवसेनेत घडलेल्या घडामोडींनी निवडणुकीपूर्वीच पक्षाला अडचणीत आणले आहे. पश्चिम शहर प्रमुखालाच तिकीट नाकारण्यात आल्याने पक्षातील अस्वस्थता उघडपणे समोर आली असून या एका प्रभागाच्या तिकिटाचा विषय थेट दिल्लीपर्यंत पोहोचल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
शहर प्रमुखाचे तिकीट नाकारले, थेट केंद्रीय मंत्र्याचा, अकोल्याच्या बड्या उपनेत्याला फोन..!
महापालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान शिवसेनेत तिकीट नाकारल्याने नाराज झालेल्या शिंदे शिवसेनेच्या पश्चिम शहर प्रमुखांनी थेट केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याशी फोनवरून संपर्क साधत आपली नाराजी व्यक्त केल्याची जोरदार चर्चा आहे. दोन वर्षांपासून निवडणुकीची तयारी केली असताना ऐनवेळी तिकीट कापल्याने अन्याय झाल्याची भावना त्यांनी मांडल्याचे बोलले जात आहे. या फोननंतर केंद्रीय मंत्री जाधव यांनीही प्रकरणाची दखल घेत पक्षाच्या एका वरिष्ठ उपनेत्याशी संपर्क साधला. तिकीट का नाकारले, असा थेट सवाल केल्यानंतर संबंधित उपनेत्यांनी राजकीय गणित मांडत, ज्या समाजाचे मतदान निर्णायक ठरणार आहे, त्याच समाजातील उमेदवार देणे अपरिहार्य होते, असे स्पष्टीकरण दिल्याची माहिती आहे. तिकीट एका प्रभागाचे असले तरी त्याचे पडसाद थेट दिल्लीपर्यंत गेल्याने पुढे आणखी कोणकोणाचे फोन वाजणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
नक्की वाचा - PMC Election 2026: उमेदवारीवरुन कलह! पठ्ठ्याने एबी फॉर्म गिळून विषयच संपवला, पुण्यात काय घडलं?
दरम्यान, महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने तिकीट वाटप करताना शिंदे शिवसेनेच्या नेत्यांची मोठी कसरत सुरू आहे. पक्षातील उपजिल्हाप्रमुख आणि माजी नगरसेवक शशिकांत चोपडे यांनाही तिकीट नाकारण्यात आलं आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे शहर प्रमुख रमेश गायकवाड यांनाही तिकीट नाकारून त्यांच्या जागी गुजराती भाषिक उमेदवाराला संधी दिल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे. त्यामुळे शिंदे शिवसेनेत भाषिक आणि संघटनात्मक वाद उफाळून आला असून अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर आली आहे.
शिवसेनेचा उमेदवार निघाला ठेकेदार, आक्षेपानंतर अर्ज बाद..
अशातच काल झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीदरम्यान शिंदे शिवसेनेला आणखी मोठा धक्का बसला. प्रभाग क्रमांक ८-अ मधून शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार सचिन विश्वंभर उज्जैनकर यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद केला. भाजपचे प्रतिस्पर्धी उमेदवार तुषार भिरड यांनी उज्जैनकर हे शासकीय ठेकेदार असल्याचे ठोस पुरावे सादर करत आक्षेप नोंदवला होता. त्या आक्षेपाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. अधिकृत उमेदवाराचाच अर्ज बाद झाल्याने शिंदे शिवसेनेत तसेच संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, उद्यापर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असून ३ तारखेला अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. त्यानंतर अकोल्यातील महापालिका निवडणुकीचे अंतिम राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
