CM Devendra Fadnavis Akola Speech : "महानगरपालिकांमध्ये महायुती सरकार स्थापन होईल. अकोल्यातील लाडक्या बहिणी लखपती झाल्या पाहिजेत.मी कोणावर टीका करणार नाही.ही मनपा आपल्या हाती आली पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप युतीत एकत्र आहेत. 15 तारखेला कमळ आणि घड्याळ निशाणीवर मतदान करून एक हाती सत्ता द्यावी", असं मोठं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदारांना केलं आहे. ते अकोल्यात महायुतीच्या प्रचारसभेत बोलत होते.
ते पुढे म्हणाले, "महाराष्ट्रात जवळपास 29 महानगरपालिकांमध्ये निवडणुका चालल्या आहेत. महाराष्ट्र हा देशामध्ये 2 क्रमांकाचं नागरिकरण झालेलं राज्य आहे. महाराष्ट्रात एकूण जी लोकसंख्या आहे, त्या लोकसंख्येच्या 50 टक्के लोकं ही शहरांमध्ये राहतात. जवळ जवळ 6 कोटी लोकं ही महाराष्ट्रातल्या 40 हजार गावांमध्ये राहतात आणि तेव्हढीच 6 कोटी लोकं ही महाराष्ट्रातल्या अकोल्यासारख्या 400 शहरांमध्ये राहतात. हा जो काही नागरी भाग आहे, त्यातही जवळपास साडेचार-पाच कोटी लोक हे 29 शहरांमध्ये राहतात.ही महानगरपालिकेची निवडणूक जवळपास 40-45 टक्के लोकांच्या जीवनावर परिणाम करणारी अशी निवडणूक आहे".
नक्की वाचा >> Maharashtra Election 2026 : महाराष्ट्रातील सर्व 29 महानगरपालिकांसाठी किती उमेदवार रिंगणात? पाहा संपूर्ण यादी
"7 दशकं आमच्या राज्यकर्त्यांना या गोष्टीचा विसर पडला"
देवेंद्र फडणवीस मतदारांना संबोधीत करताना पुढे म्हणाले, "अनेक वर्षापर्यंत आपल्या देशात एक संकल्पना होती.ती संकल्पना चूक नव्हती, ती बरोबर होती. ती संकल्पना म्हणजे भारत हा गावांमध्ये राहतो.गावांचा विकास म्हणजे देशाचा विकास.पण जवळ जवळ 7 दशकं आमच्या राज्यकर्त्यांना या गोष्टीचा विसर पडला की, भारतीत शहरं देखील आहेत. शहरात ही लोकं राहतात. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य रोजगारासाठी शहराकडे लोक येत असतात. म्हणून शहरांचंही नियोजन केलं पाहिजे.शहरांचाही विकास केला पाहिजे".
नक्की वाचा >> IAS-IPS होण्यासाठी UPSC ची परीक्षा हिंदी भाषेत देऊ शकता का? 99.99 टक्के लोकांना माहितीच नाही
"लोकांना राहायला जागा नाही,झोपडपट्ट्या तयार झाल्या.."
"लोकं शहरात आले, पण आलेल्या लोकांना राहायला जागा नाही.झोपडपट्ट्या तयार झाल्या. ज्या बिचाऱ्याला जिथे जागा मिळेल तिथे त्याने अतिक्रमण केलं.जमेल तसं लोक राहू लागले. शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या समस्या, घनकचऱ्याच्या समस्या, भुयारी गटारांच्या समस्या, अशी अवस्था झाली की, नाल्यांतून निघालेलं पाणी आपल्या नद्यांमध्ये, विहिरींमध्ये आपल्या तलावांमध्ये जातंय.सगळीकडे कचऱ्याचे ढीग पडले आहेत.अशा प्रकारची शहरांची अवस्था या देशामध्ये तयार झाली.पण 2014 साली ज्यावेळी देशाचे प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांनी कारभार स्वीकारला, त्यावेळी मोदीजींनी सांगितलं, भारत जसा गावात राहतो तसा भारत शहरातही राहतो.गावाचा तर विकास करावाच लागेल,पण शहराचा विकास देखील करावा लागेल", असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world