Ambernath Election : अंबरनाथच्या उपनगराध्यक्षपद निवडणुकीत भाजपा बोल्ड! शिवसेनेच्या फिल्डिंगवर NCP चा सिक्सर!

Ambernath Election : संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या अंबरनाथ उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का बसला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Ambernath Election : अंबरनाथ उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शेवटच्या क्षणी चित्र फिरलं.
अंबरनाथ:

Ambernath Election : संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या अंबरनाथ उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत  राष्ट्रवादी काँग्रेसचे सदाशिव पाटील विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपाच्या प्रदीप पाटील यांचा पराभव केलाय. विशेष म्हणजे शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे राष्ट्रवादीचा उपनगराध्यक्ष झालाय. या निकालामुळे अंबरनाथच्या राजकारणात नवे वळण आले असून आगामी काळातील राजकीय संघर्षाचे संकेत मिळाले आहेत.

कशी झाली निवडणूक?

या निवडणुकीसाठी अंबरनाथ विकास आघाडीने आपल्या सर्व नगरसेवकांसाठी व्हीप जारी केला होता. जो नगरसेवक या आदेशाचे उल्लंघन करेल, त्याच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याचा थेट इशारा देण्यात आला होता. अशा तणावाच्या वातावरणात पार पडलेल्या निवडणुकीत सर्वांच्या नजरा प्रामुख्याने अजित पवार गटाच्या 4 नगरसेवकांकडे लागल्या होत्या. 

या नगरसेवकांनी शेवटच्या क्षणी भाजपाची साथ सोडत शिवसेनेशी हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला. भाजपा आणि शिवसेनेच्या या अंतर्गत वादात राष्ट्रवादीला मोठा फायदा झाला असून, अवघे 4 नगरसेवक असूनही त्यांनी उपनगराध्यक्षपद आपल्या खिशात घातले आहे.

( नक्की वाचा : ZP Election 2026 : जिल्हा परिषद निवडणुकीचे काउंटडाऊन सुरू;48 तासांमध्ये मोठी घोषणा? वाचा काय आहे कोर्टाचा आदेश )

संख्याबळाचे गणित आणि नाट्यमय घडामोडी

अंबरनाथ नगरपरिषदेच्या 59 नगरसेवकांचे गणित अत्यंत रंजक होते. मागील निवडणुकीत काँग्रेसचे 12 नगरसेवक निवडून आले होते. मात्र, भाजपने एकनाथ शिंदे यांच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी काँग्रेससोबत युती केली होती. या युतीनंतर काँग्रेसने आपल्या 12 नगरसेवकांना निलंबित केले होते, ज्यांनी तातडीने भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे भाजपाचे स्वतःचे 14 आणि काँग्रेसमधून आलेले 12 असे मिळून एकूण 26 सदस्य झाले होते. त्यात एका अपक्ष उमेदवाराचा पाठिंबा मिळाल्याने भाजपाचे संख्याबळ 27 पर्यंत पोहोचले होते.

Advertisement

समीकरण बदलले आणि शिवसेनेने बाजी 

दुसरीकडे शिवसेनेकडेही 27 नगरसेवक होते. अशा वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 4 नगरसेवकांची भूमिका निर्णायक ठरणार होती. अखेर राष्ट्रवादीने भाजपाची साथ सोडत शिवसेनेला पाठिंबा दिला आणि पूर्ण चित्रच पालटले. या निवडणुकीसाठी भाजपचे नेते किसन कथोरे यांनी स्वतः मैदानात उतरून व्यूहरचना केली होती, तर शिवसेनेकडून खासदार श्रीकांत शिंदे यांनी सर्व सूत्रे हलवली होती. अखेर या प्रतिष्ठेच्या लढाईत शिवसेनेने बाजी मारली आणि सदाशिव पाटील उपनगराध्यक्ष झाले.
 

Topics mentioned in this article