- अमरावती महापालिका निवडणुकीसाठी भाजपने आमदार संजय कुटेंना जबाबदारी दिली असून ते सध्या अमरावतीत वास्तव्यास आहेत
- संजय कुटेंवर भाजपच्या निष्ठावंतांना वगळून आयात उमेदवारांना उमेदवारी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ४ जानेवारीला अमरावती दौऱ्यावर येणार असून रोड शो पंचवटी चौकातून दुपारी सुरू होईल
शुभम बायस्कार
Amravati News: अमरावती महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी जळगाव जामोदचे आमदार, माजी मंत्री संजय कुटे यांच्यावर जबाबदारी दिली आहे. त्यामुळे, गेल्या काही दिवसांपासून संजय कुटे हे अमरावतीला वास्तव्यास आहेत. भाजपच्या निष्ठावंतांना डावलून आमदार कुटेंनी आयात केलेल्या उमेदवारांना उमेदवारी दिल्याच्या त्यांच्यावर आरोप होत आहे. त्यामुळे वादात सापडलेले कुटे गेल्या काही दिवसांपासून माध्यमांपासून अलीप्त होते. अखेर कुटे हे माध्यमांसमोर आले. त्यांनी भाजपच्या बंडखोरांनी केलेले आरोपही फेटाळून लावले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 4 जानेवारी रोजी अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याची माहिती देण्यासाठी आमदार संजय कुटे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेला भाजपचे खासदार अनिल बोंडे, शहराध्यक्ष डॉ.नितीन धांडे उपस्थित होते. यावेळी बोलताना संजय कुटे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी रोड शो करणार आहेत. पंचवटी चौकातून दुपारी 12 वाजता या रोड शोला सुरुवात होईल असं ते म्हणाले.
त्यानंतर शेगाव नाका, कॉटन मार्केट, चौधरी चौक, आदर्श हॉटेल, जयस्तंभ चौक, शाम चौक, राजकमल चौक, गांधी चौक, शीलांगण रोड, साईनगर या मार्गावर फडणवीसांचा मेगा रोड शो होणारे आहे. या रोड शोची भाजपकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी अंबा नगरी सज्ज झाली असल्याची माहिती संजय कुटे यांनी दिली. दरम्यान माध्यमांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनाही त्यांनी उत्तर दिली. भाजपच्या महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष श्रद्धा गहलोद यांनी संजय कुटे यांनी दारू पिऊन तिकट वाटल्याचा गंभीर आरोप केला होता.
नक्की वाचा - 'हिजाबवर जर कोणी हात टाकला तर हात कापून टाकेन' जलील यांची धमकी कुणाला? वाद पेटणार?
या आरोपावर त्यांनी हसून उत्तर दिलं. त्यांनी महिला पदाधिकाऱ्यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. 'मी घेत नसतो, माझ्या मतदारसंघातील सगळ्यांना माहिती आहे' माझा मागचा व्हिडिओ एका मित्राने चिडून टाकला होता. त्या व्यक्तीच्या व्हिडिओच्या आधारावर त्यांनी हे वक्तव्य केलं असावं असं स्पष्टीकरण संजय कुटे यांनी दिलं. अमरावतीत भाजप आणि शिवसेनेची युती होणार हे शेवटपर्यंत सांगितलं जात होतं. मात्र ऐनवेळी युती तुटली. याचं कारणही संजय कुटे यांनी सांगितलं. ते म्हणाले शिवसेनेला 15 जागा देण्याचे ठरवलं होतं. मात्र कुठली सीट कोणाला द्यायची याचा पेच कायम राहिला. त्यामुळे युती तुटली. असा खुलासा ही आमदार संजय कुटे यांनी केला.